Vaibhav Suryavanshi : इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिल त्याच्या बॅटनं नवे रेकॉर्ड करत आहे. त्याचबरोबर 14 वर्षांचा भारतीय बॅटर वैभव सूर्यवंशीचाही धडका सुरु आहे. टीम इंडियाची अंडर-19 टीम सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात शनिवारी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन-डेमध्ये नवा रेकॉर्ड केला आहे.
वैभवनं अंडर-19 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सर्वात जलद सेंच्युरी झळकावली आहे. वॉर्सेस्टशायर येथे इंग्लंड-19 संघाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वैभवने केवळ 52 बॉलमध्ये 10 फोर आणि 7 सिक्सच्या मदतीने सेंच्युरी पूर्ण केली. याचा अर्थ, त्याने या सेंच्युरीमध्ये 81 रन्स फक्त फोर आणि सिक्सच्या मदतीनं काढले. यापूर्वी हा रेकॉर्ड पाकिस्तानच्या कामरान गुलामच्या नावावर होता. त्याने फक्त 53 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली. वैभवनं एकूण 78 बॉलमध्ये 13 फोर आणि 10 सिक्सच्या मदतीनं 143 रन्स काढून आऊट झाला.
( नक्की वाचा : Shubman Gill : शुबमन गिलनं घडवला इतिहास, विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड मोडला!)
वैभवचा दमदार फॉर्म
या शतकी खेळीपूर्वी खेळलेल्या तीन सामन्यांमध्येही वैभवने इंग्लिश गोलंदाजांची जोरदार धुलाई केली होती. पण, यापूर्वीच्या मॅचमध्ये त्याला सेंच्युरी झळकावता आली नव्हती. सुरुवातीच्या 3 सामन्यांमध्ये वैभवने 19 बॉलमध्ये 48, 34 बॉलमध्ये 45 आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 31 बॉलमध्ये 86 रन्स केले होते. तिसऱ्या सामन्यात मिळालेला आत्मविश्वास वैभवने पुढे नेला आणि या वेळी शतकासह खेळीचा शेवट केला. बाद होण्यापूर्वी या तुफानी फलंदाजाने 143 रन्सची खेळी केली.
गेल्या वर्षी ज्युनियर टेस्टमध्येही बनवला होता विक्रम...
गेल्या वर्षीच वैभवने चेन्नईमध्ये अंडर-19 कसोटी क्रिकेटमध्येही दुसरी सर्वात जलद सेंच्युरी झळकावली होती. तेव्हा त्याने शंभरीचा आकडा केवळ 56 बॉलमध्ये गाठला होता. त्याआधी हा पराक्रम इंग्लंडच्या मोईन अलीच्या नावावर होता. मोईनने 2005 मध्ये 56 चेंडूंमध्येच सेंच्युरी झळकावली होती.