Big revelation on Vinod Kambli: माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हा गेल्या काही वर्षांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे. अफाट नैसर्गिक गुणवत्तेचा क्रिकेटपटू म्हणून विनोद ओळखला जात असे. तो आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हे शाळकरी मित्र. त्याचीही गुणवत्ता सचिनच्या तोडीस-तोड होती असं अनेक जाणकार सांगतात. पण, विनोदला त्याच्या गुणवत्तेला क्रिकेटच्या मैदानावर न्याय देता आला नाही.
वैयक्तिक आयुष्यातही विनोदच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. त्याची आर्थिक परिस्थितीही चांगली नसल्याचं उघड झालं होतं. विनोदच्या जुन्या सहकाऱ्यानं त्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. एका तरुण खेळाडूनं काय करावं आणि काय करु नये याचं हा किस्सा उदाहरण आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे किस्सा?
1992 साली सचिन तेंडुलकरचा यॉर्कशायर काउंटीशी करार करणारे सोली ॲडम्स यांनी हा किस्सा सांगितला. त्यावेळी विनोद कांबळी देखील इंग्लंडमध्येच होता. त्यानं एका स्थानिक क्लबसाठी खेळून मोठी प्रसिद्धी मिळवली होती. या काळात त्याचे अनेक मित्र झाले होते. सोलीने सांगितले की, त्या दिवसांत कांबळीने अर्धवेळ नोकरीची ऑफर नाकारली होती.
सोलीने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले, 'एक दिवस आम्ही 10 खेळाडू बसलो होतो. विनोद आणि सचिन वगळता बाकीचे सर्व खेळाडू अर्धवेळ नोकरी करत होते. त्यावेळी मुंबईच्या एका क्रिकेटपटूने कांबळीला विचारले की, आता जेव्हा त्यांना प्रत्येक सामन्यासाठी 25 पाउंड मिळतात, तर तू सोलीच्या कोणत्याही एका ठिकाणी अर्धवेळ नोकरी का करत नाहीस?'
( नक्की वाचा : मित्र असावा तर असा... सचिन तेंडुलकरनं घेतली विनोद कांबळीची भेट! Video पाहून फॅन्स इमोशनल )
सोलीने पुढे सांगितले, 'तेव्हा विनोदने एक मिनिटही विचार न करता सांगितले की, तो आणि सचिन कसोटी क्रिकेटमधून पैसे कमावतील. मला अर्धवेळ नोकरी करून माझे लक्ष विचलित करायचे नाही. हा एक खूपच वेगळा दृष्टिकोन होता. त्याचा आत्मविश्वास अद्भुत होता. तो खूप तरुण होते. तो टेस्ट क्रिकेटर होण्यास अद्याप बराच कालावधी होता. पण त्याच्यात खूप आत्मविश्वास होता.'
सोली यांनी पुढे सांगितले, 'विनोद भारतात परतल्यानंतर त्याने त्याचे सर्व पैसे वडिलांकडून घेतले. ते त्याच्या मित्रांसोबत खर्च केले. विनोदने कधी पैशांची पर्वा केली नाही आणि ना त्याला त्याबद्दल आदर होता.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सचिन आणि कांबळीचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात विनोदची परिस्थिती पाहून सर्वजण हेलावले होते. त्यावेळी त्याची प्रकृती चांगलीच खालावली होती. त्यानंतर अनेक दिग्गजांनी कांबळीला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता.