Virat Kohli RCB Podcast 2026 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खोऱ्याने रन ओढणाऱ्या विराट कोहलीच्या मनात सध्या काय सुरू आहे? तो 2027 चा वन डे वर्ल्ड कप खेळणार की नाही? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं स्वतः विराटने अत्यंत सडेतोडपणे दिली आहेत. गेल्या काही काळातील चढ-उतार आणि भविष्यातील प्लॅन्स यावर विराटने पहिल्यांदाच मनमोकळा संवाद साधला आहे. टीममध्ये स्वतःचं स्थान आणि आपली किंमत सिद्ध करण्यावरून विराटने मांडलेलं परखड मत सध्या क्रिकेट जगतात चांगलंच चर्चेत आलं आहे.
आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना विराटने त्याच्या क्रिकेट करिअरबद्दल आणि विशेषतः 2027 च्या वर्ल्ड कपमधील सहभागाबद्दल मोठी वक्तव्यं केली आहेत. मी मैदानावर शंभर टक्के योगदान देतो, पण तरीही जर कोणाला माझी लायकी सिद्ध करायला सांगायची असेल, तर मी तिथे थांबणार नाही, असा स्पष्ट इशारा विराटने दिला आहे.
काय म्हणाला विराट?
आपल्या भविष्यातील प्लॅन्सवर बोलताना विराटने सांगितलं की, माझा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट आहे. जर मी संघासाठी योगदान देऊ शकत असेल आणि टीमलाही माझी गरज वाटत असेल, तर मी नक्कीच खेळत राहीन. पण मला वारंवार माझी क्षमता आणि महत्त्व सिद्ध करायला भाग पाडलं जात असेल, तर ती जागा माझ्यासाठी नाही. मी माझ्या खेळाशी आणि तयारीशी कधीच प्रतारणा करत नाही. मी देवाचा आभारी आहे की त्याने मला या करिअरमध्ये भरभरून दिलं आहे.
विराटने पुढे म्हटलं की, मी मैदानात उतरतो तेव्हा पूर्ण एकाग्रतेने खेळतो. इतर कोणत्याही खेळाडूइतकीच, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मेहनत मी घेतो. टीमसाठी वन डे मॅचमध्ये 40 ओव्हरपर्यंत बाउंड्री लाईनवर धावायची माझी तयारी असते आणि मी ते कोणतीही तक्रार न करता करतो. प्रत्येक बॉल हा माझ्या करिअरचा शेवटचा बॉल आहे, याच विचाराने मी 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी करतो. इतकं करूनही जर माझी किंमत डावलली जाणार असेल, तर मी तिथे राहणार नाही.
( नक्की वाचा : Virat Kohli विराटने मोडले सर्व रेकॉर्ड्स! 13 बॉलच्या वादळात असा पराक्रम केला की क्रिकेट जगताचे डोळे विस्फारले )
पुन्हा लहान मुलासारखं वाटलं
सुमारे दोन दशकांनंतर दिल्लीच्या टीमकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या अनुभवही विराटने सांगितला. या टूर्नामेंटमधील 2 मॅचमध्ये विराटने 208 रन केले, ज्यामध्ये एका वादळी सेंच्युरीचा आणि एका हाफ सेंच्युरीचा समावेश होता. बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये जेव्हा हे मॅच झाले, तेव्हा तिथे एकही प्रेक्षक नव्हता.
या अनुभवाबद्दल सांगताना विराट म्हणाला की, मी इतकी वर्ष क्रिकेट खेळलो आहे, त्यामुळे प्रेक्षकांशिवाय खेळणं माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल का, असा विचार आधी मनात आला. पण खेळपट्टीवर उतरताच माझा विचार बदलला. मला बॅटिंग करायला आवडते, म्हणून मी खेळत होतो. तिथे मला पुन्हा एका लहान मुलासारखं वाटलं. लोकांचं काम माझ्यासाठी गोष्टी अवघड करायचं असेल, तर त्यांनी एकतर सुरुवातीलाच सगळं स्पष्ट सांगावं, नाहीतर गप्प बसून मला खेळू द्यावं.
खेळाची तुलना सामान्य नोकरीशी
विराटने या संपूर्ण परिस्थितीची तुलना एका सामान्य नोकरीशी केली. नोकरीमध्ये जसं एका आठवड्यात तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळतो आणि पुढच्याच आठवड्यात तुमच्या क्षमतेवर संशय घेतला जातो, तसंच काहीसं इथे होतंय असं विराटने स्पष्ट केलं. तो म्हणाला की, जर तुम्हाला मी नको असेल, तर पहिल्याच दिवशी सांगून टाका. पण मी चांगला खेळत आहे असं वाटत असेल, तर विनाकारण प्रश्न उपस्थित करणं बंद करा.
विराटने सांगितलं की, मी कोणत्याही सिरीजची तयारी अचानक 2 ते 3 आठवडे आधी करत नाही. मी संपूर्ण वर्षभर त्याच फिटनेसमधून जातो. घरात चांगलं खाणं आणि वर्कआउट ही माझी जीवनशैली आहे. त्यामुळे मी कोणत्याही सिरीजसाठी नेहमीच तयार असतो. आता आपण 2026 च्या मध्यभागी आहोत आणि मला वारंवार 2027 च्या वर्ल्ड कपबद्दल विचारलं जातंय. मी क्रिकेट खेळत आहे, तर मला ते मनापासून खेळायचं आहे. भारतासाठी वर्ल्ड कप खेळणं हा नेहमीच अभिमानास्पद अनुभव असतो, पण सन्मान दोन्ही बाजूंनी राखला गेला पाहिजे.
विराट कोहलीची वन डे क्रिकेटमधील कामगिरी
विराट कोहलीने वन डे क्रिकेटमध्ये स्वतःला जगातील सर्वोत्कृष्ट बॅटर म्हणून सिद्ध केलं आहे. त्याने आतापर्यंत 311 मॅचच्या 299 डावांमध्ये 58.71 च्या सरासरीने आणि 93.82 च्या स्ट्राईक रेटने तब्बल 14,797 रन केले आहेत, ज्यात 54 शतकं आणि 77 अर्धशतकांचा समावेश आहे. 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता, तर त्यापूर्वी खराब फॉर्मच्या काळानंतर त्याने टेस्ट क्रिकेटलाही रामराम ठोकला होता.
या वर्षात विराटने 3 वन डे मॅच खेळले असून, 3 डावांमध्ये 80.00 च्या सरासरीने आणि 105 च्या स्ट्राईक रेटने 240 रन केले आहेत, ज्यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. आयपीएल संपल्यानंतर विराट आता 14 जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध भारतामध्ये होणाऱ्या वन डे सिरीजमध्ये खेळताना दिसणार आहे.