भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रांची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 17 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात विराट कोहली याने तुफानी फलंदाजी करत 135 धावांची खेळी करून मोठा वाटा उचलला. कोहलीच्या या शानदार शतकाने मैदानातील उपस्थित तसेच टीव्हीवरील चाहत्यांचे मन जिंकले. मात्र, कोहलीने शतक पूर्ण करताच, स्टँड्समध्ये बसलेल्या एका 'मिस्ट्री गर्ल' ची रिअॅक्शन व्हायरल झाली. सोशल मीडियावर या 'मिस्ट्री गर्ल' बद्दल जोरदार चर्चा सुरू आहे.
कोहलीचं 52 वं शतक
रांची वनडेत विराट कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीतील 52 वे शतक पूर्ण केले. त्याने 120 चेंडूंमध्ये 135 धावांची धमाकेदार खेळी केली. कोहली, केएल राहुल (60 धावा) आणि रोहित शर्मा (57 धावा) यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिकेसमोर 349 धावांचा डोंगर उभा करण्यात यश मिळवले. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 332 धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि भारताने हा सामना 17 धावांनी जिंकला. विराट कोहलीला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोहलीच्या शतकानंतर ती झाली व्हायरल
सामन्यादरम्यान जेव्हा 'किंग कोहली' ने आपले शतक पूर्ण केले, तेव्हा कॅमेऱ्याचे लक्ष प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका तरुणीकडे गेले. तिची उत्स्फूर्त आणि निरागस प्रतिक्रिया लगेचच कॅमेऱ्यात कैद झाली. कोहलीने शतक पूर्ण करताच, या तरुणीने आनंदाने आणि उत्साहाने आपले दोन्ही हात गालावर ठेवले. तिचा हा मनमोहक आणि सुंदर अंदाज चाहत्यांना खूप भावला आणि काही क्षणातच तिची ही रिअॅक्शन सोशल मीडियावर 'व्हायरल' झाली.
कोण आहे व्हायरल गर्ल?
कोहलीच्या शतकावर ज्या 'मिस्ट्री गर्ल' ची रिअॅक्शन व्हायरल झाली आहे, तिचे नाव रिया वर्मा (Riya Verma) असल्याचे सांगितले जात आहे. तिचा आकर्षक लूक चाहत्यांना खूप आवडला. मिळालेल्या माहितीनुसार, रिया वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यूट्यूबवर तिचे 3 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत, तर इंस्टाग्रामवर तिला जवळपास 25 लाख लोक फॉलो करतात. याचा अर्थ ती सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. रियाने या सामन्यातील एक व्हिडिओ तिच्या यू-ट्यूब चॅनलवरही पोस्ट केला आहे.