WI vs AUS, Umpiring Controversy : वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बार्बाडोसमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये यजमान टीमचा 159 रन्सनं पराभव झाला. या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकन थर्ड अंपायर एड्रियन होल्डस्टॉक यांनी दिलेल्या खराब निर्णयांमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. अंपायरच्या बँक खात्याची चौकशी करा, अशी मागणी फॅन्सकडून होतीय. तर वेस्ट इंडिजचा नवोदित टेस्ट कॅप्टन रोस्टन चेसनंही खराब अंपायरिंगवर जाहीर नाराजी व्यक्त केली. या संशयास्पद निर्णयाचा निकालावर परिणाम झाल्याचं त्यानं मॅचनंतर सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोणत्या निर्णयावर वाद?
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बार्बाडोस टेस्टमधील दुसऱ्या दिवशी एक-दोन नाही तर चार निर्णयांवर आक्षेप घेतला जात आहे. यापैकी सर्वाधिक आक्षेप हा वेस्ट इंडिजचा बॅटर शाई होपला आऊट दिल्यानंतर झाला. होप 48 रन्सवर खेळत असताना ऑस्ट्रेलियन विकेट किपर ॲलेक्स कॅरी त्याचा कॅच घेतल्याचा दावा केला.
फील्ड अंपायर्सनी टीव्ही अंपायर होल्डस्टॉक यांच्याकडे तो रिव्ह्यू करण्यासाठी पाठवला, ज्यात रिप्लेमध्ये स्पष्ट दिसले की बॉल कॅरीच्या हातात असताना जमिनीला स्पर्श करत होता. पण त्यानंतरही होल्डस्टॉकनं होप आऊट असल्याचा निर्णय दिला. वेस्ट इंडिजचे कोच डॅरेन सॅमीनं या निर्णयावर ड्रेसिंग रुममध्ये जोरदार नाराजी व्यक्त केली.
चेस काय म्हणाला?
या मॅचनंतर बोलताना चेसनं खराब अंपायरिंगवर निराशा व्यक्त केली. तो म्हणाला, 'हा सामना माझ्या आणि संघासाठी निराशाजनक होता, कारण आम्ही ऑस्ट्रेलियाला तुलनेने कमी धावसंख्येवर बाद केले होते. आम्ही याबद्दल खूप आनंदी होतो. परंतु त्यानंतर सामन्यात अनेक संशयास्पद निर्णय झाले आणि त्यापैकी कोणताही आमच्या बाजूने गेला नाही. एक खेळाडू म्हणून, तुम्ही मैदानावर असता, तुम्ही आपले सर्वोत्तम देता, तुम्ही संघर्ष करता आणि त्यानंतर काहीही तुमच्या बाजूने होत नाही. हे त्रासदायक असते.'