Rahul Dravid on Vinod Kambli : मुंबईतील एका कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकत्र आले होते. त्यांच्या व्हिडिओचे सोशल मीडियावर जोरदार पडसाद उमटले. एरवी क्रिकेटपासून कोसो दूर असलेले नेटीझन्सही या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. विनोद कांबळीची क्रिकेट कारकिर्द का बहरली नाही? हा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. महान भारतीय क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडनं याबाबतचं कारण यापूर्वीच सांगितलं होतं. सचिन आणि विनोदमधील फरक सांगणारा राहुल द्रविडचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अविश्वसीय गुणवत्ता पण....
सचिन तेंडुलकरचा बालमित्र असलेल्या विनोद कांबळीनं 1991 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. विनोदचा पदार्पणानंतर मोठा गवगवा झाला. त्यानं क्रिकेट फॅन्सना प्रभावित केलं होतं. 104 वन-डे आणि 17 टेस्ट खेळणाऱ्या कांबळीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द एक दशक देखील चालली नाही. भारताकडून 509 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या राहुल द्रविडने एकदा विनोद कांबळीच्या कारकिर्दीचं विश्लेषण केलं होतं. कांबळीकडं बॉल टोलवण्याची अविश्वसनीय गुणवत्ता होती. पण एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्यासाठी काय करावं लागतं हे समजण्याची प्रतिभा कदाचित कांबळीकडं नव्हती, असं द्रविडनं सांगितलं.
( नक्की वाचा : मित्र असावा तर असा... सचिन तेंडुलकरनं घेतली विनोद कांबळीची भेट ! Video पाहून फॅन्स इमोशनल )
काय म्हणाला द्रविड?
या व्हायरल व्हिडिओमध्ये द्रविड म्हणतो, 'मला वाटतं आपण गुणवत्तेचा विचार चुकीच्या पद्धतीनं करतो. मी देखील ती चूक केली होती. क्रिकेट बॉल टोलवण्याच्या क्षमतेवर आपण खेळाडूच्या गुणवत्तेचा विचार करतो. क्रिकेट बॉल टोलवण्याची पद्धत, टायमिंग याचा आपण विचार करतो. पण, त्याचबरोबर दृढ निश्चय, धाडस, शिस्त आणि स्वभाव या गोष्टींचाही गुणवत्तेनमध्ये विचार करायला हवा. तुम्ही गुणवत्तेचा विचार करत असताना या सर्व गोष्टींचा एकत्र पॅकेज म्हणून विचार करायला हवा.'
द्रविड पुढं म्हणाला, ' हे समजावणं अवघड आहे. पण, काही जणांमध्ये टायमिंग आणि बॉल टोलवण्याची गुणवत्ता असते. सौरव गांगुलीकडं उत्तम कव्हर ड्राईव्ह करण्याची क्षमता होती. सचिन आणि वीरुमध्येही (सेहवाग) होती. तुम्ही हे गौतमबाबत (गंभीर) म्हणणार नाही. पण, त्यामुळे गौतम कमी यशस्वी आहे, असं नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा गुणवत्तेचा एकाच बाजूने विचार करता त्यावेळी त्याचे अन्य पैलू पाहात नाही. त्यानंतर तुम्ही तो खेळाडू अयशस्वी झाला असा निष्कर्ष काढता. आपण नेहमी एक पैलू पाहतो, पण, त्याच्यामध्ये कदाचित अन्य गुणवत्ता नसावी.
म्हणून सचिन, सचिन आहे
द्रविडनं पुढं सांगितलं, 'मी आजवर भेटलेल्या चांगल्या व्यक्तींपैकी विनोद कांबळी आहे. विनोदकडं बॉल टोलावण्याची अद्भुत क्षमता होती. मला राजकोटचा एक सामना आठवतोय. त्या मॅचमध्ये विनोदनं जवागल (श्रीनाथ) आणि अनिल (कुंबळे) विरुद्ध 150 रन काढले होते. ते अविश्वसनीय होतं.
अनिलचा पहिला बॉल विनोदनं सरळ दगडी भिंतीवर मारला होता. त्यावेळी राजकोटमध्ये एक दगडी भिंत होती. त्यानं सरळ तो बॉल तिकडं मारलं. आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो होतो. पण, त्याच्यामध्ये कदाचित अन्य गोष्टींमधील गुणवत्ता नव्हती. एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्यासाठी काय करावं, तणाव आणि दबाव कसा सहन करावा हे समजण्याची त्याच्यात गुणवत्ता नव्हती. मी अंदाज करु शकतो की कदाचित सचिनमध्ये ही गोष्ट कितीतरी जास्त होती. त्यामुळे आज सचिन तिथं आहे.