Sachin Yadav: वर्ल्ड ॲथलेटिक्समध्ये नीरज चोप्रापेक्षा सरस कामगिरी करणारा 'हा' भारतीय खेळाडू कोण?

Who is Sachin Yadav?: भालाफेक म्हंटलं की नीरज चोप्रा हे नाव भारतीयांच्या डोक्यात फिट आहे. पण, सचिननं चक्क नीरजला मागे टाकलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sachin Yadav : सचिन यादवनं नीरज चोप्राला मागं टाकत इतिहास घडवला आहे.
मुंबई:

World Athletics Championships 2025 : भालाफेक म्हंटलं की नीरज चोप्रा हे नाव भारतीयांच्या डोक्यात फिट आहे. नीरजनं ऑलिम्पिक गोल्ड मेडलसह बहुतेक स्पर्धा जिंकत या खेळातील त्याचं प्रभुत्व सिद्ध केलंय. ऑलिम्पिक स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये दोन मेडल मिळवणारा तो एकमेव भारतीय आहे. नीरजच्या या ऐतिहासिक पराक्रमापासून प्रेरणा घेत अनेक तरुण भालाफेकीकडे वळत आहेत. त्यापैकी सचिन यादव या खेळाडूनं आता चक्क जगातील सर्वोच्च नीरजला मागं टाकण्याचा पराक्रम केला आहे.

टोकियोमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 च्या भालाफेक स्पर्धेत भारताचा तरुण खेळाडू सचिन यादवने लक्षवेधी कामगिरी केली. भारताचा ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीम यांच्यातील द्वंद्व पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रीडाप्रेमींसाठी सचिन यादवने एक सुखद धक्का दिला.

26 वर्षीय सचिनने आपल्या पहिल्याच प्रयत्नात 86.27 मीटरचा वैयक्तिक सर्वोत्तम (Personal Best) थ्रो करत सर्वांना मागे टाकले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने नीरज चोप्रा (8व्या स्थानावर) आणि अर्शद नदीम (10व्या स्थानावर) यांना मागे टाकत चौथे स्थान पटकावले.

( नक्की वाचा : Pakistan vs UAE: पाकिस्तान क्रिकेटचा ड्रामा, ICC चा एक इशारा, 2 मोठे धोके... म्हणून घातले लोटांगण )
 

कोण आहे सचिन यादव?

उत्तर प्रदेशातील बागपत जवळच्या खेकडा या गावात 25 ऑक्टोबर 1999 रोजी सचिनचा जन्म झाला. सर्वकालीन महान क्रिकेटपटूचं नाव असलेल्या सचिनचं स्वप्नही क्रिकेटपटू व्हायचं होतं. टीम इंडियाचा वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आणि फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह हे त्याचे आदर्श आहेत. 

Advertisement

उत्तर प्रदेशातील भुवनेश्वर कुमार, प्रवीण कुमार, आरपी सिंह हे फास्ट बॉलर गेल्या दशकात उदयाला आले. त्यांनी टीम इंडियाकडून खेळताना ठसा उमटवला. सचिनलाही त्यांच्याप्रमाणे फास्ट बॉलर व्हायचं होतं. पण, नियतीला काही वेगळंच मान्य होतं. 6 फुट 5 इंच उंचीचं वरदान लाभलेला सचिन वयाच्या 19 व्या वर्षी भालाफेकीकडे वळाला. त्यानंतर याच खेळात त्यानं स्वत:च्या यशाचा झेंडा रोवला आहे. 

सचिनची यशोगाथा

सचिनने २०२५ च्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये 85.16 मीटरच्या थ्रोसह रौप्य पदक जिंकले होते. याच वर्षी, त्याने डेहराडून येथे झालेल्या ३८व्या राष्ट्रीय खेळांमध्ये 84.39 मीटरचा थ्रो करत सुवर्णपदक पटकावले होते. त्यावेळी हा त्याचा वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो होता.

Advertisement

पहिल्या ‘नीरज चोप्रा क्लासिक' स्पर्धेत त्याला थोडक्यात मेडलनं हुलकावणी दिली 82.33 मीटरच्या थ्रोसह तो चौथ्या स्थानावर राहिला. वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पात्रता फेरीत सचिनने 80.16 मीटरचा थ्रो करून सुरुवात केली, पण नंतर 83.67 मीटरचा थ्रो करत अंतिम 12 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. त्यानंतर फायनलमध्येही त्यानं खेळ उंचावत चौथा क्रमांक पटकावला. सचिनचं या स्पर्धेतील मेडल हुकलं असलं तरी भविष्यात तो नव्या विक्रमासह ते पटकावेल हा विश्वास त्याच्या आजवरच्या कामगिरीनं मिळाला आहे.