भारतच नाही तर जागतिक महिला क्रिकेटमधील महान खेळाडूंमध्ये मिताली राजचा (Mithali Raj) समावेश होतो. आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड सध्या मितालीच्या नावावर आहे. 1999 ते 2022 अशी 23 वर्ष मिताली क्रिकेट खेळली. या कालावधीमध्ये तिनं अनेक रेकॉर्ड केले. ती भारतीय क्रिकेट टीमची बरीच वर्ष कॅप्टन होती. त्यानंतरही बुधवारी (3 डिसेंबर 2024) वयाची 42 वर्ष पूर्ण करणाऱ्या मितालीनं अद्याप लग्न का केलं नाही? हा प्रश्न अनेकांना सतावतो. स्वत: मितालीनंच नुकत्याच एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबतचा खुलासा केला आहे.
काय म्हणाली मिताली?
मिताली राजनं या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये वैयक्तिक आयुष्य तसंच डेटिंग लाईफबद्दलच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली आहेत. 'मी एका रिलेशनिपमध्ये होते. मी त्या मुलाचा नंबर घेतला. त्याला डेट केलं, पण माझी बांधिलकी खेळाशी आहे. या नात्यात कसलीही बांधिलकी नाही, असं मी त्याला स्पष्टपणे सांगितलं,' असं मिताली म्हणाली. आपण त्या व्यक्तीला ट्रेनिंगच्या दरम्यान भेटल्याचं उत्तर मितालीनं दिलं.
( नक्की वाचा : विनोद कांबळीचं उदाहरण दिलं तरी पृथ्वी शॉला समजलं नाही, प्रवीण आम्रेनं सांगितला किस्सा )
...तुला क्रिकेट सोडावं लागेल
मितालीनं या मुलाखतीमध्ये अॅरेंज मॅरेजबाबतच्या काही प्रयत्नांचीही माहिती दिली. 'माझी अॅरेंज मॅरेजबाबत अशी कोणती बैठक झाली नाही. पण, काही जणांशी फोनवर बोलणं झालं होतं. मी महिला टीमची कॅप्टन असताना मला एकाचा लग्नासाठी फोन आला होता. आमचं आगोदर सामान्य बोलणं झालं. त्यानंतर त्यानं मला लग्नानंतर किती मुलं हवी आहेत असा प्रश्न विचारला. इतकंच नाही तर लग्नानंतर मुलांची आणि कुटुंबाची जबाबदारी असल्यानं मला क्रिकेट सोडावं लागेल, असं सांगितलं. मी तेव्हा भारतीय टीमची कॅप्टन होते. त्याचं बोलणं ऐकूण मला आश्चर्य वाटलं,' असं मिताली म्हणाली.
....तेव्हा क्रिकेट सोडणार होते
मितालीनं यावेळी तिच्या मनात क्रिकेट सोडण्याचा विचार कधी आला होता, याचा देखील खुलासा केला. 'त्यावेळी क्रिकेट हा मध्यमवर्गीयांचा खेळ नव्हता. त्यामुळे अनेक मुली एका ठराविक काळापर्यंत क्रिकेट खेळत असतं. त्यानंतर खेळात काय आहे? असं विचारलं जात असे. 2009 मध्ये मी देखील या कालखंडातून गेले आहे. हा वर्ल्ड कप खेळल्यानंतर मी निवृत्त होईन. स्वत:चं वैवाहिक आयुष्य सुरु करेल असा विचार मनात आला होता, असं मिताली म्हणाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मितालीची कारकिर्द
मिताली राजनं 1999 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 23 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मितालीनं 232 वन-डेमध्ये 7805 रन केले. 12 टेस्टमध्ये 699 तर 89 T20 इंटरनॅशनलमध्ये 2364 रन तिच्या नावावर आहेत. मिलालीनं टेस्टमध्ये 1 तर वन-डेमध्ये 7 सेंच्युरी झळकावल्या आहेत. तर टेस्ट, वन-डे आणि T20 मध्ये अनुक्रमे 4, 64 आणि 17 हाफ सेंच्युरी तिच्या नावावर आहेत.