BLOG : पॅरिसच्या 6 पदकांनी करुन दिली खडतर भविष्याची जाणीव

भारताचे किमान ५-६ खेळाडू हे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिले आहेत. विचार करुन पाहा ही सर्व पदकं भारताला मिळाली असती तर कदाचीत यंदा पदक तालिकेत पदकांचा दुहेरी आकडा गाठता आला असता.

जाहिरात
Read Time: 6 mins
मुंबई:

अनेक कारणांसाठी पॅरिस ऑलिम्पिक हे गेल्या काही वर्षांतलं भारताचं कामगिरीच्या दृष्टीने सर्वात निराशाजनक ऑलिम्पिक आहे. १०० ग्रॅम वाढीव वजनामुळे भारताचे येऊ शकणारं अपेक्षित गोल्ड मेडल हुकलं. किमान ५-६ खेळाडू हे चौथ्या क्रमांकावर राहिले ज्यामुळे त्या ही संभाव्य पदकांना आपण मुकलो.

नाही म्हणालया नेमबाजी, हॉकी, भालाफेक आणि कुस्तीच्या या यशामुळे भारताला काहीप्रमाणात दिलासा दिलाय. परंतु पुढचं भवितव्य हे अतिशय खडतर असणार आहे. पॅरिसमध्ये जे मोजकं यश पदरात पडलं आहे, त्याचा आनंद साजरा झाला असेल तर २०२८ साली लॉस एंजलीस शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचा रस्ता किती खडतर असणार आहे याचा थोडक्यात आढावा घेऊया...

Advertisement

ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताला पदक मिळण्याच्या आशा काही ठराविक खेळांमध्येच असतात. हे खेळ कोणते तर... वेटलिफ्टींग, नेमबाजी, बॅडमिंटन, कुस्ती आणि सांघिक खेळांमध्ये हॉकी. हे क्रीडा प्रकार असे आहेत की यामध्ये किमान एकतरी पदक भारताला मिळेल याची आपण खात्री बाळगू शकतो...आणि याव्यतिरीक्त जर एखादा खेळाडू किंवा एखादा क्रीडा प्रकार सरप्राईज पॅकेज सारखा पुढे आला तर मग ती लॉटरी समजायची. २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकने काय केलं तर या स्पर्धेने आपल्याला आरसा दाखवला की पुढचा रस्ता हा किती खडतर आहे आणि आपल्याला किती मजल अजुनही मारायची आहे.

Advertisement

पॅरिसमध्ये लक्ष्य सेन याने ब्राँझ पदकाचा सामना एका सेटची आघाडी असतानाही गमावल्यानंतर माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी आता खेळाडूंनी निकालाची जबाबदारी स्वतः घेणं गरजेचं आहे असं विधान केलं होतं. त्यांच्या बोलण्यात एक वाक्य साधारण अशा आशायचं होतं. भारतात गुणी खेळाडूंची वानवा नाहीये...परंतु आपल्याकडे एका क्रीडा प्रकारात एका खेळाडूला मोठं यश मिळालं की त्याच्या यशापुढे बाकीच्या खेळाडूंचे कष्ट झाकोळले जातात. प्रत्येक स्पर्धेत मीडिया म्हणा किंवा मग बाकीचे घटक म्हणा सगळा फोकस हा त्या एका खेळाडूवरच असतो. ज्यामुळे त्याच्याव्यतिरीक्त अन्य खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली तरीही त्यांचं यश हे अधोरेखित होत नाही.

Advertisement

अगदी शांतपणे याचा विचार करायला गेला तर यात बरंच तथ्य असल्याचं आपल्याला दिसून येईल. चला तर मग आढावा घेऊयात....पहिला खेळ आहे बॅडमिंटन....

ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताला बॅडमिंटनमध्ये पहिल्यांदा पदक मिळवून दिलं ते सायना नेहवालने. साहजिकच भारतीयांना आणि भारतीय मीडियाला हे पुरेसं होतं सेलिब्रेशनसाठी. सायना नेहवाल लगेच मीडियासाठी फुलराणी झाली. परंतु दुर्दैवाने नंतरच्या काळात दुखापतींच्या सत्रामुळे तर कधी खराब फॉर्ममुळे सायना नेहवाल कधीच पदकाच्या शर्यतीत राहिलेली पहायला मिळाली नाही. प्रत्येक स्पर्धेत तिने मेहनत १०० काय अगदी १ हजार टक्के घेतली. परंतु तिचा खेळ ज्यांनी फॉलो केला आहे ते नक्की सांगू शकतील की सायना नेहवाल आपल्याला आता पदक मिळवून देणार नाही. कालांतराने हेच खरं सिद्ध झालं आणि भारताची फुलराणी सिंधूच्या यशात झाकोळली गेली.

पी.व्ही.सिंधू ही आणखी एक गुणवान खेळाडू. साधारणपणे सायना नेहवालच्या नजिकच्या काळातच ती देखील भारताकडून खेळायला लागली. २०१६ रियो आणि त्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने पदकं जिंकून स्वतःला सिद्ध केलं. साहजिकच तिचं हे यश पुरेसं होतं मीडिया आणि फॅन्ससाठी की प्रत्येक स्पर्धेतून तिच्याकडून यशाची अपेक्षा केली जाईल. ही अपेक्षा करण्यात काहीही चूक नाही परंतू या दरम्यानच्या काळात सायना आणि सिंधूच्या तोडीची एकही खेळाडू भारतीय बॅडमिंटन असोसिएशन तयार करु शकली नाहीये जी ऑलिम्पिक पातळीवर तर सोडाच एशियन गेम्समध्ये मेडल मिळवू शकेल. शेवटी एका खेळाडूकडून एखाद्याने किती अपेक्षा करायच्या यालाही काही मर्यादा असतात. पॅरिस ऑलिम्पिकआधी ज्या काही स्पर्धा झाल्यात त्यात सिंधूचा ढासळलेला फॉर्म आणि दुखापती पाहता तिच्याकडून पदकाची आशा खरंतर नव्हती. पण हाय रे दुर्दैवं ती सोडली तर बॅडमिंटनमध्ये आपल्याकडे एकही खेळाडू नव्हती. मग हा दोष नेमका द्यायचा तरी कोणाला? इथल्या व्यवस्थेला? इथल्या मीडियाला की आणखी कोणाला??

बॅडमिंटन दुहेरीमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रणकीरेड्डी ही युवा जोडगोळी अतिशय आश्वासक खेळ करणारी आहे. ही जोडी यंदा पदक मिळवेल अशी आशा होती...परंतु त्यांच्याही पदरी निराशा पडली. महिला दुहेरीमध्ये तर सध्या भारतात एकदी खेळाडू अशा दर्जाचा नाहीये की त्यांच्याकडून पदकाची आशा केली जाईल. गंमत पाहा पॅरिसमध्ये पदक हुकल्यानंतर सिंधूला प्रश्न विचारण्यात आला की तू पुढच्या ऑलिम्पिकला खेळशील का? पुढच्या ऑलिम्पिकला ४ वर्ष अद्याप बाकी आहे. एखाद्या खेळाडूच्या आयुष्यात हा कालावधी खूप मोठा असतो...होत्याचं नव्हतं होण्यासाठी आणि नव्हत्याचं होतं होण्यासाठी. म्हणजे अजुनही आपण बॅडमिंटनमध्ये सिंधूच्या तोडीची खेळाडू तयार करण्याऐवजी तिच्याच खांद्यावर आशा-अपेक्षांचं वजन टाकून बसलो आहे. सांगा बरं कसं मिळेल पदक? 

पुरुषांमध्ये विचार करायला गेलं तर लक्ष्य सेन, किदम्बी श्रीकांत, एच.एच.प्रणॉय हे काही आश्वासक खेळाडू आहेत. यापैकी किदम्बी श्रीकांत पुढील स्पर्धेपर्यंत त्याच तडफेने खेळू शकेल की नाही याबद्दल शंका आहे. लक्ष्य आणि प्रणॉय यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे, परंतु त्यांनाही अद्याप बऱ्याच सुधारणांची गरज आहे.

आता वळूया कुस्तीकडे...विनेश फोगाटच्या नशिबी भारतात आणि भारताबाहेर ऑलिम्पिकमध्ये जो काही संघर्ष आला तो खरंच मन हेलावून टाकणारा आहे. हे प्रकरण हाताळण्यात भारताचं केंद्र सरकार हे संपूर्णपणे अपयशी ठरलं आहे. राजकीय फायद्यासाठी एका व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात कुस्तीची बसलेली घडी पूर्णपणे विस्कटून गेली आहे. विनेश फोगाटने व्यवस्थेशी संघर्ष करत पॅरिसचं तिकीट मिळवलं. परंतु बजरंग पुनिया इतका नशीबवान नव्हता. अमन सेहरावतच्या रुपाने भारताला यंदा कुस्तीत एकमेव ब्राँझ मिळालं आहे. परंतु हा आकडा नक्कीच भुषणावह नाही.

अंतिम पांघल, रितीका डोग्रा, अंशु यासारख्या महिला कुस्तीपटूंनी यंदा निराशा केली. भारताला कुस्तीची मोठी परंपरा आहे. पण ही परंपरा जर फक्त भारतापूरती मर्यादीत राहिली तर तिचा फायदा काय? भविष्यात कुस्तीची ही विस्कटलेली घडी व्यवस्थित बसवून लॉस एंजलिस ऑलिम्पिकला किमान दोन तरी पदकं येतील हे आव्हान इथल्या यंत्रणेसमोर आणि त्याचसोबत खेळाडूंच्यासमोरही असणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम पांघलच्या परिवारासोबत झालेलं कृत्य हे देशासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट नाही. भारतीय खेळाडूंमध्ये आणखी प्रोफेशनलिझम येण्याची गरज आहे.

वेटलिफ्टींगमध्येही मीराबाई चानू सोडली तर सध्याच्या घडीला एकही आश्वासक नाव डोळ्यासमोर येत नाही...किंवा मग जे खेळाडू एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्सला चांगली कामगिरी करतात त्यांच्या कामगिरीत सातत्य राहत नाही. ही परिस्थिती शेकडो कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला भूषणावह नक्कीच नाही. त्यामुळे अमेरिकेत २०२८ ला या क्रीडा प्रकारातही भारताला मोठं काम करावं लागेलं. भालाफेकीमध्ये नीरज चोप्राने सलग दोन पदकं मिळवून दिली आहेत. परंतु आता गरज आहे किशोर जीना, अनु राणी आणि त्यांच्यासारख्या अन्य भारतीय खेळाडूंना नीरज चोप्राच्या प्रमाणे तयार करण्याची. नाहीतर व्हायचं असं की पुढच्या स्पर्धेपर्यंत आपल्या आशा या नीरजच्या खांद्यावरच ओझं म्हणून राहतील आणि त्या ओझ्यामुळे तो कदाचीत सिल्वर वरुन ब्राँझ वर घसरेल.

भारतीय पुरुष हॉकी संघाने सलग दोन ऑलिम्पिक ब्राँझ जिंकत सर्वांचं मन जिंकलंय. परंतु यंदाच्या स्पर्धेत भारताचे सर्व गोल हे पेनल्टी कॉर्नरवर आलेत ही बाब विसरुन चालता येणार नाही. मोक्याच्या क्षणी भारतीय खेळाडू मैदानी गोल करायला कमी पडत आहेत हे या स्पर्धेत आणि याआधी अनेक स्पर्धांमध्ये दिसून आलंय. पेनल्टी कॉर्नरवरही भारताचा गोल कन्व्हर्जन रेट हा खूप कमी आहे. त्यातच हरमनप्रीतच्या रुपाने भारताकडे सध्या एकच ड्रॅगफ्लिकर आहे ज्यावर आपण विसंबून राहू शकतो. त्यामुळे परिस्थिती बदलायची असेल तर भारतीय हॉकीलाही बऱ्याच सुधारणा करायची गरज आहे, नाहीतर अमेरिकेतही कदाचीत ब्राँझ पदकावरच समाधान मानावं लागेल.

क्रिकेटचा अपवाद सोडला तर भारतीयांचं क्रीडा प्रेम हे बेगडी आहे असं मला नेहमी वाटत राहिलेलं आहे. ऑलिम्पिकबद्दल तर आपण स्पर्धेच्या एक महिनाआधी आणि स्पर्धा संपल्यानंतर पुढचे काही दिवस उमाळा आलेला असतो. हे पुरेसं नाही...जर जागतिक पातळीवर भारताने क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करायची असेल तर सरकारी यंत्रणा, प्रसारमाध्यमं, क्रीडा संघटनांसोबत ही जबाबदारी भारतीयांचीही आहे की आपण या खेळाडूंना पाठींबा देत राहून त्याचं कौतुक करायला हवं...नाहीतर ऑलिम्पिक म्हणजे भारतासाठी बोलाची कढी आणि बोलाचा भात होऊ बसेल.