Year Ender 2024 : भारतीय क्रिकेटसाठी (Indian Cricket) 2024 हे वर्ष चढ उताराचं ठरलं. या वर्षी भारतीय फॅन्सची आयसीसी विजेतेपदाची प्रतीक्षा संपली. तब्बल 11 वर्षांनी टीम इंडियानं T20 वर्ल्ड कप जिंकला. भारतीय क्रिकेटसाठी या वर्षातील तो सर्वोच्च क्षण होता. पण, त्याचबरोबर मायदेशात टेस्ट सीरिज न गमावण्याची 12 वर्षांची परंपरा देखील खंडीत झाली. न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजमध्ये टीम इंडियाला व्हाईटवॉशची नामुश्की सहन करावी लागली. भारतीय क्रिकेटसाठी हे वर्ष कसं गेलं पाहूया
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
T20 वर्ल्ड कप विजेतेपद (T20 World Cup 2024)
गेल्या 11 वर्षांपासून आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद टीम इंडियाला हुलकावणी देत होतं. यंदा ती प्रतीक्षा अखेर संपली. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत झालेल्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत विश्वविजेता झाला. 2013 नंतर पहिल्यांदाच भारताला आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद मिळालं. तर 2007 नंतर 17 वर्षांनी T20 वर्ल्ड कप जिंकला.
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा या स्पर्धेत सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. तर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या. विराट कोहलीनं फायनलमध्ये सर्वाधिक रन करत विजेतेपदामध्ये योगदान दिलं. हार्दिक पांड्याची ऑल राऊंड कामगिरी तसंच निर्णायक क्षणी सूर्यकुमार यादवनं डेव्हिड मिलरचा कॅच घेतला. या सर्व आठवणी भारतीय फॅन्सच्या दीर्घकाळ स्मरणात राहणार आहेत.
T20 वर्ल्ड कप विजेतेपदासाह कोच राहुल द्रविडनं भारतीय टीमला अलविदा केलं. 16 वर्षांपूर्वाी (ODI World Cup 2007) वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आलं होतं. त्या टीमचा द्रविड कॅप्टन होता. त्यानंतर त्याच देशात द्रविडनं कोच म्हणून भारतीय टीमसोबत विजेतेपद जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा या महान क्रिकेटपटूंनीही वर्ल्ड कप विजेतेपदासह T20 क्रिकेटला अलविदा केला.