जाहिरात

Hardik Pandya : व्हिलन ते हिरो! सारं काही विरोधात असताना हार्दिकनं कसा जिंकून दिला भारताला वर्ल्ड कप?

Hardik Pandya Comeback Story : अगदी 140 कोटी नाही पण किमान 70 कोटी भारतीयांनी विजयाची आशा सोडून दिली होती. सारं काही विपरीत घडत असताना टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं हार्दिक पांड्याच्या हाती बॉल दिला. 

Hardik Pandya : व्हिलन ते हिरो! सारं काही विरोधात असताना हार्दिकनं कसा जिंकून दिला भारताला वर्ल्ड कप?
Rohit Sharma kisses Hardik Pandya © Twitter
मुंबई:

Hardik Pandya Comeback Story : दक्षिण आफ्रिकेला टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये फक्त 26 रन हवे होते. हेन्रिच क्लासेन आणि डेव्हिड मिलर ही आक्रमक जोडी मैदानात होती. क्लासेननं आक्रमक अर्धशतक झालं होतं. मिलरनं मैदानात येताच हात साफ करत त्याचा 'किलर' खेळ खेळण्यास सुरु केला होता. अगदी 140 कोटी नाही पण किमान 70 कोटी भारतीयांनी विजयाची आशा सोडून दिली होती. सारं काही विपरीत घडत असताना टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं हार्दिक पांड्याच्या हाती बॉल दिला. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

हार्दिकसाठी रोजचा अनुभव

भारतीय टीमसाठी,भारतीय फॅन्ससाठी परिस्थिती कठीण होती. पण, हार्दिकसाठी हे काही नवं नव्हतं. गेल्या काही महिन्यांपासून तो रोज हेच अनुभवत होता.ज्या मुंबई इंडियन्समध्ये तो घडला, त्यांनीच त्याला गुजरात टायटन्सकडून खरेदी केलं आणि कॅप्टन केलं. मुंबईच्या फॅन्सना त्याचा निर्णय आवडला नाही. मैदानात आणि मैदानाच्या बाहेर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. 

आयपीएलमधील पांड्याचा फॉर्म आणि फिटनेस ट्रोलर्सना आणखी चेव देणारा होता. हार्दिकची मुंबई इंडियन्स सपेशल अपयशी ठरली. हार्दिकही फेल गेला. टी20 वर्ल्ड कप टीममधील त्याच्या जागेवर प्रश्न विचारण्यात आले.

'हार्दिक संपला', 'तो टीमचं ओझं आहे', 'त्याचं आणि रोहितचं पटत नाही, 'तो टीम मॅनेजमेंटला नको होता,'टीममध्ये पक्की जागा नसलेला खेळाडू व्हाईस कॅप्टन कसा? असे अनेक प्रश्न या स्पर्धेपूर्वी विचारण्यात आले.यामधील अनेक जण हार्दिक कुठं चुकतोय? याची वाट पाहात होते.

हार्दिकनं या स्पर्धेत एकही पाऊल चुकीचं न टाकता, त्याच्या कामगिरीच्या जोरावर सर्व ट्रोलर्सना खणखणीत उत्तर दिलंय.  

( नक्की वाचा : हार्दिक पांड्याच्या प्रश्नावर आगरकरनं एकाच वाक्यात दिलं उत्तर )
 

फायनलचा हिरो

दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 24 बॉलमध्ये 26 रन हवे होते. त्यावेळी बॉलिंगला आलेल्या हार्दिकनं स्वत:चे खांदे पाडले नाहीत. त्यानं पहिल्याच बॉलवर क्लासेनला आऊट केला. दक्षिण आफ्रिकेला हा मोठा धक्का होता. हार्दिकच्या या विकेटनं टीम इंडियाला मॅचमध्ये परत येण्याची संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेला मोठ्या मॅचचं टेन्शन जाणवू लागलं. हार्दिकनं 17 व्या ओव्हरमध्ये फक्त 4 रन देत ते टेन्शन वाढवलं.

शेवटच्या ओव्हरमध्ये काय झालं?

हार्दिकनं 17 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियला मॅचमध्ये परत आणलं. त्यानंतर तो शेवटची म्हणजेच विसावी ओव्हर टाकायला आला. त्यावेळी देखील धोका टळला नव्हता. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 6 बॉलमध्ये 16 रन हवे होते. तडाखेबंद डेव्हिड मिलर मैदानात असताना हे सहज शक्य होतं. 

( Rohit Sharma Retirement: विराटनंतर कॅप्टन रोहित शर्माची T20 इंटरनॅशनलमधून निवृत्तीची घोषणा )
 

हार्दिकनं त्याच्या आजवरच्या क्रिकेट कारकि‍र्दीमधील सर्वात महत्त्वाची ओव्हर शांत डोक्यानं आणि घोटीव पद्धतीनं टाकली. त्यानं त्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर डेव्हिड मिलरला आऊट केलं. त्यानंतर पाचव्या बॉलवर कागिसो रबाडालाही परत पाठवलं. टीम इंडियाचा आयसीसी स्पर्धेतील विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात हार्दिकच्या शेवटच्या ओव्हरचा निर्णायक वाटा होता.हार्दिकनं टी 20 वर्ल्ड कप फायनलमधील 3 ओव्हर्समध्ये 20 रन देत 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.

मॅच जिंकली तेंव्हा हार्दिक काय करत होता?

टीम इंडियानं 7 रन्सनी फायनल मॅच जिंकली. भारतीय क्रिकेट टीमचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपला. भारतानं मॅच जिंकल्यानंतर काही क्षणांनी कॅमेरा हार्दिकच्या दिशेनं पॅन करण्यात आला. त्यावेळी हार्दिक मैदानात खाली डोकं करुन गुडघ्यावर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर अश्रू होते. त्याच्या शरीराचा प्रत्येक भाग ओला झाला होता. 30 वर्षांच्या भारतीय टी20 टीमच्या व्हाईस कॅप्टननं एक मोठी लढाई दृढनिश्चयाच्या जोरावर जिंकली होती. सारं जग टी20 क्रिकेटच्या इतिहासातील तो महान क्षण अनुभवत होतं. 

हार्दिक मैदानातून बाहेर जात असताना आयसीसीच्या ब्रॉडकास्टरनं त्याला प्रतिक्रिया देण्यासाठी विचारलं त्यावेळी हार्दिकचे शब्द होते, 'मला डोळे पुसू दे...'
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com