जमालगोट्यामुळे टक्कल जाऊन केसांची भराभर होते वाढ? फॅक्ट चेकमधून उघड झाले सत्य

Baldness And Hairfall Problem Jamalgota Treatment Fact Check: या ट्रीटमेंटचे नाव जमालगोटा ट्रीटमेंट असून त्याने फायदा होत असल्याचे दावे केले जाऊ लागले आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

गेल्या काही वर्षांत टक्कल पडण्याचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसू लागले आहे. टक्कल पडू नये यासाठी विकली जाणारी औषधे, तेलं याचाही खप वाढू लागला आहे. ज्यांना टक्कल पडलंय ते पुन्हा केस उगवावेत यासाठी वाट्टेल ते उपाय करू लागले आहेत. सोशल मीडियावर सध्या टकल्यांची जत्रा भरत असून तिथे टक्कल पडलेल्या लोकांवर इलाज केला जात असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागले आहेत. 20 हजारापासू एक लाखापर्यंत फॉलोअर्स असलेल्या इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्सच्या मदतीने टकलावर इलाज करण्यासाठी एक विशेष ट्रीटमेंट सुरू असून ती निशुल्क असल्याने तिथे जत्रा भरल्याचे व्हिडीओ अनेकदा बघायला मिळू लागले आहे. या ट्रीटमेंटचे नाव जमालगोटा ट्रीटमेंट असून त्याने फायदा होत असल्याचे दावे केले जाऊ लागले आहेत. 

इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी फॉलोईंग असलेल्या किरण पास्टे, एकता काशिद आदित्य निबडे यांनी जमालगोटा ट्रीटमेंटचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या ट्रीटमेंटचा चांगला फायदा होत असल्याचा दावा हे इन्फ्लुएन्सर करताना दिसत आहेत.  मुंबई आणि आसपासच्या परिसरात वेगवेगळ्या भागांमध्ये ही ट्रीटमेंट सुरू असल्याचे या व्हिडीओंवरून दिसते आहे.

Advertisement

जमालगोट्यामुळे खरंच टक्कल दूर होते का ? असा प्रश्न विचारला असता कॉस्मेटिक सर्जन डॉ. अपूर्वा सामंत यांनी म्हटले की, जमालगोट्याची पावडर खाल्ल्याने किंवा जमालगोट्याची पेस्ट स्कॅल्पवर लावल्यास केसांची वाढ होतेय किंवा टक्कल पडलेल्या लोकांना केस येत आहेत, अशा आशयाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जमालगोटा म्हणजे क्रोटॉन सीड्स एक्सट्रॅक्ट्स, ज्यावर दुधामध्ये प्रक्रिया करुन ते शुद्ध केले जाते आणि त्यापासून पावडर तयार केली जाते. आयुर्वेदानुसार त्वचा, केसांसाठी उपयुक्त ठरतील असे गुणधर्म जमालगोट्यामध्ये आहेत, त्यामुळे फायदे असंख्य होऊ शकतात. पण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात जमालगोट्याचे सेवन केले नाही तर पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. कारण क्रोटॉन सीड्स पचनास अतिशय जड असतात. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी त्याचा फारसा फायदा होतो, असा उल्लेख कोणत्याही रिसर्चमध्ये आढळत नाही.

Advertisement

आतापर्यंत पोट साफ होत नसेल तर जमालगोटा दिला जातो हे आपल्या सगळ्यांना ऐकिवात आहे. मात्र केस  परत येण्यासाठी जमालगोट्याचा वापर केला जातो हे नव्यानेच कळू लागले आहे. जमालगोट्याचा वापर हा फारतर पोट साफ होण्यासाठी, शरीर डीटॉक्स करण्यासाठी केला जाऊ शकतो मात्र केसांच्या वाढीसाठी त्याचा फायदा होत असल्याच्या दाव्याला कोणताही शास्त्रीय आधार नाहीये. जमालगोट्याच्या सेवनाने शरीर डिटॉक्स होऊ शकतं, आणि त्याने शरीर शुद्धीसोबत केसांच्या वाढीला बळकटी मिळू शकते हे एकवेळ पटू शकतं मात्र टकलावर जमालगोट्याची पावडर लावल्याने केस वाढत असल्याचे दावे संशयास्पद आहेत. केस गळण्याची अनेक कारणे असतात, ज्यामध्ये अनुवांशिकता, हार्मोनमध्ये होणारे बदल, आजारपणा अशा वेगवेगळ्या कारणांचा समावेश आहे.   केसांची नीटपणे निगा राखल्यास केसगळती कमी करता येते.  
 

Advertisement