Professor Propose Video : एका प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्लासरूममध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक एका प्रोफेसरने असे काही केले, ज्याची कल्पनाही कुणी केली नव्हती. या प्रोफेसरने चक्क आपल्याच विद्यार्थिनीला गुलाबाचे फूल आणि चॉकलेट देऊन सर्वांसमोर प्रेमाची कबुली दिली.
ही घटना घडताच संपूर्ण वर्गात शांतता पसरली, पण ही शांतता वादळापूर्वीची होती. संतापलेल्या विद्यार्थिनीने तातडीने आपल्या पायातील चप्पल काढली आणि त्या प्रोफेसरला सर्वांदेखत बदडण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, या अजब प्रेमाची आणि त्यानंतर मिळालेल्या 'प्रसादा'ची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
काय आहे प्रकरण?
हा धक्कादायक प्रकार कर्नाटक राज्याची राजधानी असलेल्या बेंगळुरूच्या बाहेरील भागात घडला आहे. नेलमंगला जवळील 'सिद्धार्थ मेडिकल कॉलेज'मध्ये हा सर्व राडा झाला.
विशेष म्हणजे, हे महाविद्यालय कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले जाते. आरोपी प्रोफेसरची ओळख अब्दुल रहमान शरीफ अशी पटली असून तो या महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागात असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होता.
( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीतील प्रसिद्ध शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाकडून शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी;शहरात संताप )
भर कॅम्पसमध्ये प्रोफेसरची धुलाई
प्रोफेसरने प्रपोज केल्यानंतर केवळ संबंधित विद्यार्थिनीनेच त्याला चप्पलेने मारले नाही, तर वर्गातील इतर विद्यार्थीही प्रचंड संतापले. विद्यार्थ्यांनी या प्रोफेसरला घेरले आणि त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. वाद इतका वाढला की विद्यार्थ्यांनी प्रोफेसरला संपूर्ण कॅम्पसमध्ये पळवून पळवून मारले.
तो आपल्या कारच्या दिशेने जात असताना तिथेही विद्यार्थ्यांनी त्याला गाठले आणि पुन्हा चोप दिला. या मारहाणीत जखमी होऊनही प्रोफेसर कसातरी जीव वाचवून तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला.
( नक्की वाचा : Mumbai: मुलुंडच्या कॉलेजमध्ये थरार; एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला, त्याचवेळी मित्रानं जे केलं त्याची चर्चा )
प्रोफेसरचा अजब दावा आणि जुन्या तक्रारी
या सर्व गोंधळानंतर प्रोफेसरने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. संबंधित विद्यार्थिनीनेच आधी आपल्याला प्रेमाची कबुली दिली होती आणि त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा त्याने केला. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने त्याचे म्हणणे फेटाळून लावले आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य दिवाकर एस. पी. यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रोफेसरबद्दल विद्यार्थिनींनी आधीही अनेकदा तक्रारी केल्या होत्या. विद्यार्थिनींच्या छळाच्या तक्रारींमुळे त्याला कॉलेज कॅम्पसमध्ये न येण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या, तरीही त्याने हे धाडस केले.
पोलीस कारवाई आणि निलंबन
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नेलमंगला ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, महाविद्यालय प्रशासनाने अब्दुल रहमान शरीफ याला तातडीने निलंबित केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारे शिक्षकानेच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याने सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत आहे.