जाहिरात

Mumbai: मुलुंडच्या कॉलेजमध्ये थरार; एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला, त्याचवेळी मित्रानं जे केलं त्याची चर्चा

Mulund College Attack : मुंबईतील मुलुंड परिसरात एका प्रसिद्ध कॉलेजच्या आवारातच थरकाप उडवणारी घटना घडली आहे.

Mumbai: मुलुंडच्या कॉलेजमध्ये थरार; एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला, त्याचवेळी मित्रानं जे केलं त्याची चर्चा
Mulund College Attack : कॉलेजच्या गजबजलेल्या आवारात हा थरार घडल्याने उपस्थित विद्यार्थ्यांची मोठी पळापळ झाली. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Mulund College Attack : मुंबईतील मुलुंड परिसरात एका प्रसिद्ध कॉलेजच्या आवारातच थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने 16 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यावेळी पीडितेच्या एका मित्राने देवदूतासारखे धावून येत आरोपीचा वार स्वतःच्या अंगावर झेलला आणि तरुणीचे प्राण वाचवले. या घटनेमुळे कॉलेज परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

ही घटना 25 मार्च रोजी घडली. पीडित मुलगी ही नेहमीप्रमाणे मुलुंड येथील तिच्या कॉलेजमध्ये आली होती. यावेळी बदलापूर येथे राहणारा 21 वर्षीय आरोपी आशिष गौतम बनसोडे तिथे पोहोचला. त्याने पाठीमागून येऊन पीडित मुलीला पकडले आणि 'तू माझ्याशी का बोलत नाहीस?' असा जाब विचारत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पीडितेने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, संतापलेल्या आशिषने आपल्याकडे असलेला धारदार कोयता काढून तिच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.

मित्राने स्वतःवर झेलला कोयत्याचा वार

आरोपी कोयत्याने वार करणार तितक्यात तिथे उपस्थित असलेला पीडित मुलीचा मित्र मध्ये आला. त्याने तरुणीला वाचवण्यासाठी स्वतःला झोकून दिले, ज्यामुळे आरोपीने केलेला कोयत्याचा वार थेट त्याच्या पाठीवर बसला. या हल्ल्यात तो मित्र गंभीर जखमी झाला आहे. भरदिवसा आणि कॉलेजच्या गजबजलेल्या आवारात हा रक्ताचा थरार घडल्याने उपस्थित विद्यार्थ्यांची मोठी पळापळ झाली.

( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीतील प्रसिद्ध शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाकडून शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी;शहरात संताप )

आरोपीला 24 तासांच्या आत बेड्या

हल्ला केल्यानंतर आरोपी आशिष बनसोडे घटनास्थळावरून पळून गेला होता. जखमी विद्यार्थ्याला इतर सहकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा छडा लावला आणि घटनेनंतर अवघ्या 24 तासांच्या आत आशिषला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला कोयताही जप्त केला आहे.

एकतर्फी प्रेमातून टोकाचे पाऊल

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी हे दोघेही बदलापूर परिसरातील रहिवासी असून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीचे पीडितेवर एकतर्फी प्रेम होते, मात्र ती त्याच्याशी बोलत नसल्याच्या रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com