जाहिरात

Kangana Ranaut: कंगना रणौत राहुल गांधींशी लग्न करणार? सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टचं काय आहे सत्य?

Kangana Ranaut: बॉलिवूडची क्वीन आणि भाजपा खासदार कंगना रणौत सध्या एका विचित्र कारणामुळे चर्चेत आली आहे.

Kangana Ranaut: कंगना रणौत राहुल गांधींशी लग्न करणार? सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टचं काय आहे सत्य?
Kangana Ranaut: सोशल मीडियावरील चर्चेला कंगनानं उत्तर दिलं आहे.
मुंबई:

Kangana Ranaut: बॉलिवूडची क्वीन आणि भाजपा खासदार कंगना रणौत सध्या एका विचित्र कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर कंगनाबद्दल एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून त्यात तिने चक्क काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावा करण्यात आला आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर कंगनाने यावर  तीव्र प्रतिक्रिया दिली असून अशा अफवा पसरवणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. राजकारणात महिलांचा सन्मान राखला जात नसल्याबद्दल तिने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावरील एका मीम पेजवरून कंगना रणौतच्या नावाने एक बनावट विधान शेअर करण्यात आले होते. यामध्ये कंगना असे म्हणत असल्याचे दाखवले होते की, जर राहुल गांधी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर मी त्यांच्याशी लग्न करायला तयार आहे. हे विधान व्हायरल होताच सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आले. मात्र, हे वृत्त पूर्णपणे खोटे आणि खोडसाळ असल्याचे आता स्पष्ट झाले असून स्वतः कंगनाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

( नक्की वाचा : Karisma Kapoor :21 वर्षांची झाली करिश्मा कपूरची मुलगी, वडिलांची होती लाडकी लेक, भावाशी खास बॉन्डिंग, Photos )

कंगना रणौतचा संताप आणि स्पष्टीकरण

या प्रकरणावर मौन सोडत कंगनाने सोशल मीडियावर ही फेक न्यूज शेअर करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. हे किती खालच्या थराचे राजकारण आहे, असे म्हणत तिने आपला संताप व्यक्त केला. राजकारणातही महिलांना कोणतीही प्रतिष्ठा उरलेली नाही, अशा शब्दांत तिने नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असे म्हणत तिने या पोस्टचा जाहीर निषेध केला आहे. कंगना रणौत नेहमीच काँग्रेसची कट्टर टीकाकार राहिली आहे, त्यामुळे अशा विधानाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.

Latest and Breaking News on NDTV

राहुल गांधींवर यापूर्वीही केली होती टीका

कंगना आणि राहुल गांधी यांच्यातील शाब्दिक युद्ध नवे नाही. संसदेत महिला आरक्षणावर राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावरूनही कंगनाने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांचे भाषण ऐकताना डोकेदुखी झाली, अशी खोचक टिप्पणी तिने माध्यमांशी बोलताना केली होती. राहुल गांधी संसदेत पोरकटपणा करत असल्याची टीकाही तिने यापूर्वी अनेकदा केली आहे. त्यामुळे लग्नाच्या अफवांनी तिला अधिकच डिवचले आहे.

राजकीय आणि सिनेसृष्टीतील वाटचाल

हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कंगना रणौतने विजय मिळवला आहे. तिने काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांचा 74,755 मतांनी पराभव केला होता. चित्रपटांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, कंगना अलीकडेच इमर्जन्सी या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन तिने स्वतः केले असून त्यात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. सध्या ती राजकारण आणि अभिनय अशा दोन्ही आघाड्यांवर सक्रिय आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com