Father Daughter Bond: वडील आणि मुलीचं नातं (Father Daughter Bond) हे जगातलं सर्वात खास नातं मानलं जातं. आपल्या कुटुंबासाठी आधारस्तंभ असलेला बाप, मुलीच्या लग्नात तिची पाठवणी होत असताना मात्र कोसळून पडतो.लग्नात मुलीला निरोप देण्याचा क्षण हा प्रत्येक पित्यासाठी आयुष्यातील सर्वात कठीण आणि भावनिक क्षण असतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका पित्याने आपल्या मुलीच्या लग्नात कन्यादानाबद्दल जे उद्गार काढले, ते ऐकून उपस्थित असलेले सर्वजण भावूक झाले आणि लाखो लोकांचे डोळे पाणावले.
'कन्यादान नाही.....'
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये, विदाईच्या वेळी एका वडिलांनी माईक हाती घेतला आणि भावनांनी दाटलेल्या आवाजात ते म्हणाले, "मी पिता आहे, कन्यादान नाही करणार… कारण माझी मुलगी वस्तू नाही, जिचं मी दान करावं. मी तिला फक्त प्रेमाच्या एका नव्या बंधनात जोडत आहे…"
वधू पित्याचे हे शब्द ऐकताच विवाहस्थळी उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे ओलावले. त्यांचा आवाज वारंवार जड होत होता, पण त्यांच्या बोलण्यातून मुलीबद्दलचं ते नितांत प्रेम स्पष्टपणे दिसत होतं, जे शब्दातीत होतं.
( नक्की वाचा : Menstruation Cycle: मासिक पाळीचा 'हा' Viral Video पाहून डोळ्यात येईल पाणी, या कुटुंबानं जिंकली सर्वांची मनं )
'बाप राजा असतो आणि मुलगी त्याची राजकुमारी'
वडील पुढे म्हणाले, "बाप गरीब असो वा श्रीमंत, तो नेहमी राजाच असतो... आणि मुलगी त्याची राजकुमारी." त्यांनी स्पष्ट केलं की, मुलगी ही केवळ दान करण्याची वस्तू नाही.
वडिलांनी व्यक्त केलेल्या भावना
माझ्या मुलीसाठी, मी कन्यादान नाही करणार. मी ते मानत नाही. कारण माझी मुलगी कोणतीही वस्तू नाही, जिचं दान करावं.
जिथे तू जात आहेस, तिथे खूप प्रेम दे, सगळ्यांना आपलंसं कर.
मी तुझं दान करत नाहीये, तर प्रेमाच्या एका नव्या बंधनात बांधत आहे. तो तू चांगला निभाव.
पण एक गोष्ट लक्षात ठेव, बाप गरीब असो वा काहीही, तो राजा असतो आणि त्याची मुलगी त्याची राजकुमारी असते, जी नेहमी त्याच्या हृदयात वास करते.
मी माझ्या काळजाच्या तुकड्याचं दान नाही करू शकत.
मी तिला एका नवीन आयुष्यासाठी, एका नवीन अनुभवासाठी, एका नवीन सुरुवातीसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
वडिलांनी व्यक्त केलेल्या या भावना आज अनेक आधुनिक विचारांच्या लोकांच्या मनातल्या भावनांना आवाज देत आहेत. या व्हिडिओने सोशल मीडियावर एक नवीन चर्चा सुरू केली आहे, ज्यात 'कन्यादान' या संकल्पनेवर पुनर्विचार करण्याची मागणी केली जात आहे.