Simple Travel Hacks : सुट्ट्या जवळ आल्या की घराघरांमध्ये माळ्यावरील सुटकेस, बॅगा खाली काढल्या जातात. जास्त माणसं असतील तर बॅगाही वाढतात. त्यामुळे बॅगा कमी असाव्यात असाच साधारणपणे आईचा प्रयत्न असतो. त्यामुळे बॅगा भरणं हा घराघरांमध्ये मोठा कार्यक्रम असतो. रात्रीच्या वेळी सर्व कपडे जमा करून बॅग भरली जाते. बॅगा कमी पण सामान जास्त अशीच सर्वत्र परिस्थिती असते. अशावेळी आईचा कस लागतो. बॅगेत दाबून दाबून कपडे भरले जातात, शेवटी त्याचं झाकण बंद होत नाही, अशावेळी घरातील लहानग्याला बॅगेवर बसवलं जातं आणि कशी बशी बॅगेची चेन बंद केली जाते.
मात्र वर्षानुवर्षे आपण चुकीच्या पद्धतीने बॅग भरत असल्याचं तुम्हाला या व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर वाटेल. या ट्रिकने सामान भरलं तर आहे त्यापेक्षा दुप्पट सामान बॅगेत किंवा सुटकेसमध्ये मावू शकतं.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक गृहिणी बॅग कशी भरायची याचे धडे देत आहे. आपण सुटकेसमध्ये कपडे भरतो तेव्हा ती आडवी ठेवतो आणि दोन विभाग करून एकावर एक कपडे ठेवतो. मात्र ही पद्धत चुकीची आहे. या काकुंनी सुटकेस उभी ठेवून त्यात कपडे भरले.
कपाटात कपडे भरताना जी पोझिशन असते त्यानुसार काकु सुटकेसमध्ये कपडे भरताना दिसत आहे. यामुळे सुटकेसमध्ये तब्बल दुप्पट कपडे राहिले. ही आयडिया सोशल मीडियावर व्हायरल झाली असून आतापर्यंत हा व्हिडिओ नऊ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.