Pune Airport News: इंडिगो एअरलाईन्सच्या सेवेत गेल्या काही दिवसांपासून मोठे अडथळे निर्माण झाले असून, त्यामुळे देशभरातील प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.पुणे मुंबई,. दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद आणि बेंगळूरु यांसारख्या भारतातील प्रमुख शहरांमधील विमानतळांवर इंडिगोच्या सुमारे 400 हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली, तर अनेक विमानांना मोठा विलंब झाला. या गोंधळामुळे प्रवाशांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेले आहे.
पुणे विमानतळावर प्रसिद्ध यूट्यूबर 8 तास खोळंबला
इंडिगोच्या या गैरव्यवस्थापनाचा फटका प्रसिद्ध युट्यूबर अरुण प्रभूदेसाई यांनाही बसला आहे. त्यांना पुणे विमानतळावरून दिल्लीला जायचे होते, परंतु ते तब्बल 8 तास विमानतळावर प्रतीक्षा करत होते. त्यांनी या संपूर्ण गोंधळाची आणि गैरसोयीची व्यथा एका व्हिडिओच्या माध्यमातून मांडली असून, तो सोशल मीडिया नेटवर्क ‘एक्स' (X) वर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये प्रभूदेसाई यांनी इंडिगोच्या व्यवस्थापनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणतात, "मित्रांनो, इतकी मोठी गैरव्यवस्था आहे. तुम्ही पाहू शकता मागे काय चाललंय. इतका मोठा गोंधळ मी आजपर्यंत पाहिला नाही. मी आज सकाळी 10 वाजता विमानतळावर आलो आहे. लोक पहाटे 3 वाजल्यापासून इथे खोळंबले आहेत, पण कोणतंही विमान नाही. कोणतीही माहिती मिळत नाहीये. खूप जणांनी काउंटरवर जाऊन चौकशी केली, पण काहीही समजलेलं नाही. सकाळपासून इंडिगोचं एकही विमान उडालेलं नाही."
( नक्की वाचा : Pune Land Scam : पुण्यातील जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अखेर अटक, मोठे खुलासे होणार? )
"माझा लाखोंचा खर्च धोक्यात"
प्रभूदेसाई पुढे सांगतात की, "मी 10 वाजता आलो होतो. मला सांगितलं 1 वाजता विमान उडेल. पण, आता सायंकाळचे 6 वाजले आहेत, तरी विमान निघालेलं नाही. विमान कधी उडेल, कुणालाच माहिती नाहीये. इंडिगोच्या काऊंटरवर फक्त एक मुलगी आहे, तिला 100-200 जण प्रश्न विचारत आहेत. ते काहीही घोषणा करत नाहीत."
या गोंधळाबद्दल त्यांनी इंडिगो एअरलाईन्सला टॅग करत एक ट्विटही (Tweet) केले. त्यात त्यांनी आपला संताप व्यक्त करत म्हटले, "तुमची पूर्णपणे अक्षमता पाहून लाज वाटते इंडिगो (@IndiGo6E). वर्षातील माझ्या महत्त्वाच्या कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम तुमच्या या गोंधळामुळे रद्द होण्याच्या धोक्यात आहे. आम्ही 10 वाजल्यापासून पुणे विमानतळावर आहोत. आमची फ्लाईट आधी दुपारी 1:05 वरून 1:25 साठी, त्यानंतर 3:30 साठी आणि आता संध्याकाळी 6 साठी पुनर्निर्धारित (rescheduled) केली गेली आहे."
प्रवाशांच्या नुकसानीला जबाबदार कोण?
आपला महत्त्वाचा कार्यक्रम धोक्यात आल्यामुळे प्रभूदेसाई यांनी इंडिगोला थेट जाब विचारला आहे. ते म्हणतात, "प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही कर्मचाऱ्याला विचारतो की, विमान खरंच उड्डाण करेल की रद्द होईल, तेव्हा त्यांच्याकडे कोणतीही स्पष्टता नसते. उत्तरे नाहीत, जबाबदारी नाही. हा केवळ विलंब नाही, तर या गोंधळामुळे माझ्या या कार्यक्रमासाठी केलेला लाखोंचा खर्च वाया जाण्याचा धोका आहे. यासाठी कोण जबाबदार आहे? या नुकसानीला कोण उत्तर देणार? इंडिगो, मला उत्तरे हवी आहेत आणि आज इथे अडकलेल्या शेकडो प्रवाशांनाही उत्तरे हवी आहेत."
इथे पाहा Video