Pune News : पुण्यातील कोरेगाव पार्क (Koregaon Park) जमीन व्यवहार प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या शीतल तेजवानीला अखेर अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून ती फरार होती, मात्र तिच्या अटकेमुळे आता या हाय-प्रोफाईल प्रकरणाच्या तपासाला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. या जमीन फसवणूक प्रकरणात राज्याचे मोठे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावरही आरोप करण्यात आले होते, ज्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले होते.
काय आहे नेमके प्रकरण?
शीतल तेजवानी हिच्यावर बावधन पोलीस ठाण्यात जमीन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-कोरेगाव पार्क येथील एका जमीन व्यवहारात फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर आहे.
या गुन्ह्याची नोंद झाल्यापासून ती पोलिसांना गुंगारा देत होती आणि बावधन पोलीस तिचा शोध घेत होते. शीतलने जमीन व्यवहारासाठी वापरलेल्या कुलमुखत्यार पत्रासाठी पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचा पत्ता दिला होता, मात्र या कंपनीला सध्या टाळे असल्यामुळे तिचा शोध घेणे पोलिसांसाठी एक आव्हान बनले होते. पिंपरीची रहिवासी असलेल्या शीतल तेजवानीला अखेर अटक करण्यात आली आहे.
( नक्की वाचा : Pune Land Scam : 'हे नाव मी पहिल्यांदाच ऐकलंय...' पार्थ पवार प्रकरणातील आरोपीवर शरद पवारांची गूढ प्रतिक्रिया )
अनेक गुन्ह्यांमध्ये आहे सहभाग
शीतल तेजवानी ही आधीपासूनच विविध आर्थिक गुन्ह्यांमध्ये अडकलेली आहे. तिच्यावर यापूर्वीही फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दी सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तिच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट (CID) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) यांनीही यापूर्वी तिच्यावर कारवाई केली असून तिला अटक देखील झाली होती.
शीतल तेजवानी आणि तिचा पती सागर सूर्यवंशी या दोघांनी मिळून याच सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेतून सुमारे 41 कोटी रुपये किमतीचे बनावट कर्ज घेतल्याचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघडकीस आला आहे. महागड्या गाड्या खरेदी करणे आणि लॉन टाकणे अशा नावांवर बँकेच्या विविध शाखांमधून हे कर्ज घेऊन त्यांनी बँकेची फसवणूक केली होती.
याव्यतिरिक्त, शीतल तेजवानीच्या विरोधात याआधीही शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत.
अमेडिया कंपनीला अडचणीत आणणाऱ्या या आरोपीवर अनेक वर्षांपासून विविध तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. कोरेगाव पार्कच्या जमीन फसवणूक प्रकरणात तिच्या अटकेमुळे पोलिसांना आता या गुन्ह्यातील अनेक महत्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world