देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये कामासाठी रोज प्रत्येकालाच धावपळ करावी लागते. सतत धावणाऱ्या मुंबईमध्ये मुसळधार पावसानं लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होते, हे सर्वांना माहिती आहे. वादळी पावसामध्ये ज्यांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर आहे, ते मुंबईकर भाग्यवान असतात. ते घरामध्ये राहून आपलं काम करु शकतात. पण, काही मुंबईकरांना पाऊस आणि वादळाची पर्वा न करता त्यांच्या कामासाठी घराबाहेर पडावं लागतं. अभिनेता जॅकी श्रॉफनंही याच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जॅकी श्रॉफनं वादळी पावसात काम करणाऱ्या मजुराचा व्हिडिओ शेअर केलाय. त्यानं या व्हिडिओला 'खरे कष्ट याला म्हणतात.. भिडू' असं कॅप्शन दिलंय. जॅकीच्या या पोस्टवर युझर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यानंतर 'एनडीटीव्ही इंडिया'नं देखील सोशल मीडियावरुन हा व्हिडिओ पोस्ट केलाय. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झालीय.
व्हायरल व्हिडिओमध्ये झोपडी आणि लहान घरांच्या वस्तीत उभी राहत असलेल्या गगनचुंबी इमारतीचं काम करणारा मजूर दिसत आहेत. पाऊस आणि वादळाची पर्वा न करता बऱ्याच उंचावर कन्स्ट्रक्शनचं काम तो करतोय. या व्हिडिओत समुद्र आणि निळ्या प्लॅस्टिकचं कव्हर असलेल्या हजारो झोपड्या दिसत आहेत. या क्लिपमध्ये पाऊस आणि वादळाचा आवाज देखील स्पष्ट ऐकू येत आहे.
हा व्हिडिओ आत्तापर्यंत 16 हजार पेक्षा जास्त लोकांनी लाईक आणि शेकडो युझर्सनी शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही जण मजूरांचे कष्ट आणि जॅकी श्रॉफची संवेदनशीलता यांची प्रशंसा करत आहेत. तर अनेक युझर्सनी मजूरांचे कष्ट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
( नक्की वाचा : अंडाभूर्जीचा स्टॉल वाचवायला गेले अन्...; पुण्याच्या झेड ब्रिजखाली तिघांचा मृत्यू )
एका युझरनं 'हे खरे कष्ट नाहीत. याला खरी गरिबी म्हणतात, भिडू', अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एकानं इतके कष्ट करुनही यांना रोज कमावा आणि खा असं आयुष्य घालवानं लागतं. तर अन्य एका युझरनं घर खर्च कसा करावा लागतो, हे फक्त गरीबच सांगू शकतात, असं म्हंटलं आहे.