Johnny Johnny Yes Papa Controversy: बालपणी सर्वात पहिली शिकवली जाणारी इंग्रजी कविता म्हणजे जॉनी-जॉनी येस पापा... ही कविता पाठ नाही अशी एकही व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. मात्र सर्वांच्याच आवडीची बालपणीची ही खास कविता लहान मुलांसाठी घातक असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री आणि प्रभारी मंत्री योगेंद्र उपाध्याय यांनी हे विधान केलं आहे. नेमकं काय आहे त्यांचे म्हणणे? जाणून घ्या...
'जॉनी जॉनी येस पापा मुलांसाठी घातक... '
उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री आणि प्रभारी मंत्री योगेंद्र उपाध्याय यांनी ६ मे रोजी कानपूर येथील मर्चंट चेंबर हॉलमध्ये आयोजित 'शिक्षामित्रांच्या' मानधनवाढ समारंभात शिक्षण आणि मूल्यांवर भाषण केले. यावेळी त्यांनी 'जॉनी जॉनी येस पापा' या लोकप्रिय इंग्रजी कवितेवर आक्षेप घेतला. ही कविता मुलांना खोटे बोलण्यास प्रोत्साहित करतात असे ते म्हणाले. हिंदी कवितांचा संदर्भ देत, मंत्र्यांनी शिक्षकांना अभ्यासक्रमासोबतच मूल्यांची शिकवण देणारी प्रणाली तयार करण्याचे आवाहन केले.
मंत्री योगेंद्र उपाध्याय म्हणाले की, जेव्हा शिक्षक गुरूची भूमिका घेतात, तेव्हाच ते शिक्षणासोबत मूल्ये देऊ शकतात. त्यांनी असा युक्तिवाद केला की, 'इटिंग शुगर, नो पापा' यांसारख्या ओळी लहानपणापासूनच मुलांच्या मनात खोटे बोलण्याचे बीज पेरतात. त्या मुलांना खोट बोलायला शिकवतात असा इशारा त्यांनी दिला. पाश्चात्य संस्कृती असलेल्या या इंग्रजी कविता आजच्या पिढीला आवश्यक असलेली मूल्ये देत नाहीत. त्यांनी जुन्या पिढ्या वाचत मोठ्या झालेल्या हिंदी कवितांची आठवण करून दिली, ज्यात जीवनाची सखोल मूल्ये सामावलेली होती.
Mumbai News: मुंबईत BMC अधिकाऱ्यावर विनयभंगाचा आरोप; आझाद मैदान पोलीस ठाण्यात FIR दाखल
दरम्यान, मर्चंट चेंबर हॉलमध्ये शिक्षामित्रांना संबोधित करताना मंत्री म्हणाले की, शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमापुरते मर्यादित नसावे. शिक्षक तो असतो जो छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलांना जीवनाचा योग्य मार्ग दाखवतो. ज्या दिवशी शिक्षक अभ्यासापलीकडील मूल्यांवर चर्चा करू लागतील, त्या दिवशी ते गुरू बनतील. तरच भावी पिढ्यांची योग्य जडणघडण शक्य होईल. या सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही दाखवण्यात आले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world