- जुनागडमधील आधार सिमेंट फॅक्टरीच्या बाहेर चौकीदारासमोर अचानक सिंह उभा राहीला
- सिंहाच्या अचानक येण्याने चौकीदार घाबरला पण तातडीने गेट बंद करून त्याने आपले प्राण वाचवले
- या घटनेमुळे फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांमध्ये दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले
गुजरातच्या जुनागड शहर आणि परिसरातील गिरनार जंगल हे आशियाई सिंहांचे हक्काचे घर मानले जाते. मात्र, याच परिसरात असलेल्या एका सिमेंट फॅक्टरीमध्ये आज काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. फॅक्टरीचा गेट बंद करण्यासाठी बाहेर आलेल्या चौकीदारासमोर अचानक सिंह उभा ठाकला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या चौकीदारचे नशिब बलवत्तर म्हणून तो वाचला अशीच प्रतिक्रीया सगळीकडे उमटताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुनागडमधील 'आधार सिमेंट फॅक्टरी'मध्ये हा प्रकार घडला. पहाटेच्या वेळी कुत्रे जोरात भुंकू लागल्याने होते. त्यामुळे काहीतरी गडबड असल्याचे चौकीदाराच्या लक्षात आले. त्यामुळे चौकीदार सावध झाला. बाहेर काय सुरू आहे हे पाहण्यासाठी तो केबिनमधून बाहेर आला. तो मुख्य गेट ओढून बंद करत असतानाच, कुत्रे पुढे धावत आले. त्या कुत्र्यांचा पाठलाग करत असलेला एक सिंह वेगाने गेटच्या दिशेने आला.
समोर सिंह पाहताच चौकीदाराची घाबरगुंडी उडाली. मात्र त्याने प्रसंगावधान राखून तातडीने गेट ओढले आणि केबिनमध्ये धाव घेतली. या घटनेनंतर तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही फॅक्टरी गिरनार जंगलाच्या जवळ असल्याने या भागात अनेकदा सिंहांचे दर्शन घडते. मात्र, अशा प्रकारे सिंहाने फॅक्टरीच्या आत शिरण्याचा प्रयत्न केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुदैवाने, गेट वेळीच बंद झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक वनविभागाला याची माहिती देण्यात आली आहे. जंगलाच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांनी रात्रीच्या वेळी आणि पहाटे काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या घटनेनंतर आजूबाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये ही भीतीचे वातावरण आहे. वन विभाग ही या घटनेनंतर सतर्क झाला आहे.