Kerala Couple Marries After 40 Years: प्रेमाची कोणतीही ठराविक वेळ नसते आणि काळ कितीही बदलला तरी खरी ओढ कधीच संपत नाही याची प्रचिती देणारी एक सुखद घटना समोर आली आहे. केरळमधील जयप्रकाश आणि रश्मी यांची प्रेमकथा सध्या सोशल मीडियावर सर्वांची मने जिंकत आहे. तारुण्यात ज्यांचे प्रेम अधुरे राहिले होते, तेच प्रेमी आता तब्बल 40 वर्षांनंतर विवाहबंधनात अडकले आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी सुरू झालेला हा नवा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
तारुण्यातील ते अधुरे प्रेम
मुण्डक्कल येथील रहिवासी असलेले जयप्रकाश आणि रश्मी तरुणपणी एकमेकांच्या प्रेमात होते. जयप्रकाश यांच्या मनात रश्मीबद्दल तीव्र भावना होत्या, मात्र त्या व्यक्त करण्याची हिंमत त्यांना कधीच झाली नाही. यादरम्यान रश्मी यांचे लग्न झाले आणि जयप्रकाश नोकरीच्या निमित्ताने परदेशात निघून गेले. काळाच्या ओघात दोघेही वेगवेगळ्या वाटांवर चालत राहिले.
जयप्रकाश यांनीही नंतर लग्न केले आणि आपले कुटुंब वसवले. अशा प्रकारे अनेक वर्षे उलटली आणि दोघांच्याही आयुष्यात अनेक चढ-उतार आले.
( नक्की वाचा : 3000 वाढपी, 100 ट्रॅक्टर्सचा ताफा, लाखो भाविकांचा जनसागर, हिवरा आश्रमातील महापंगतीचे नियोजन पाहून व्हाल थक्क )
नशिबाने पुन्हा समोरासमोर
नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. रश्मी यांच्या पतीचे साधारण 10 वर्षांपूर्वी निधन झाले, तर जयप्रकाश यांच्या पत्नीने 5 वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतला. या एकाकीपणातून बाहेर पडण्यासाठी रश्मी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि लघुपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
जयप्रकाश यांनी एका लघुपटात रश्मी यांना पाहिले आणि जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. त्यांनी आपल्या कुटुंबाच्या मदतीने रश्मी यांच्याशी संपर्क साधला. इतक्या वर्षांनंतर पुन्हा संवाद सुरू झाला आणि मनात दबलेले प्रेम पुन्हा एकदा उफाळून आले.
( नक्की वाचा : Wrong Number नं फिरवलं आयुष्याचं चाक, 60 वर्षांच्या महिलेनं केलं 35 वर्षांच्या तरुणाशी लग्न, पण, बस स्टॉपवर... )
मुलांनी पुढाकार घेऊन लावून दिले लग्न
या संपूर्ण कथेतील सर्वात कौतुकास्पद बाब म्हणजे दोन्ही कुटुंबातील मुलांनी घेतलेला निर्णय. रश्मी यांची मुलगी आणि जावई तसेच जयप्रकाश यांची मुले या सर्वांनी या नात्याला आनंदाने संमती दिली.
आपल्या आई-वडिलांना उर्वरित आयुष्य सोबतीने घालवता यावे, यासाठी मुलांनीच पुढाकार घेऊन कोच्चि येथे एका साध्या समारंभात हे लग्न लावून दिले. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अशी नशिबवान मुले कोणाला मिळतात, अशा शब्दांत नेटकरी त्यांचे कौतुक करत आहेत.
प्रेम कधीच जुने होत नाही
जयप्रकाश आणि रश्मी यांची ही गोष्ट हेच सिद्ध करते की, प्रेम खरे असेल तर काळ कितीही मोठा असला तरी तो अडथळा ठरू शकत नाही. कधी कधी आयुष्याच्या वाटा वळण घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी येतात जिथे सर्व काही अपूर्ण राहिले होते. वयाच्या 60 व्या वर्षी विवाहबंधनात अडकून या जोडप्याने दाखवून दिले आहे की, आयुष्याची दुसरी इनिंग अधिक सुंदर असू शकते.