Mysore Silk Saree Craze: म्हैसूर सिल्क साड्यांची भुरळ भारतीय महिलांमध्ये किती मोठ्या प्रमाणावर आहे, याचे एक थक्क करणारे दृश्य नुकतेच समोर आले आहे. अस्सल सिल्क साडी मिळावी यासाठी लोकांनी चक्क पहाटे 4:00 वाजल्यापासून दुकानाबाहेर रांगा लावल्या होत्या. या गर्दीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून लाखो लोकांनी तो पाहिला आहे. अगदी सूर्योदयापूर्वीच शेकडो लोक शोरूमबाहेर उभे असल्याचे पाहून नेटकरीही आश्चर्य व्यक्त करत आहेत.
कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनच्या शोरूमबाहेरचा हा सगळा प्रकार आहे. विशेष म्हणजे या साड्यांची किंमत 23,000 रुपये पासून सुरू होऊन ती तब्बल 2.5 लाख रुपये पर्यंत आहे.
इतकी मोठी किंमत असूनही ही साडी आपलीच व्हावी, यासाठी लोक तासनतास संयमाने रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळाले. ही साडी केवळ वस्त्र नसून ती एक प्रतिष्ठा मानली जात असल्यानेच ग्राहकांची अशी तुफान गर्दी उसळली आहे.
( नक्की वाचा : Pune News: खंबाटकी घाटाची झंझटच संपली, 45 मिनिटांचा प्रवास आता फक्त 7 मिनिटांत ! वाचा सर्व माहिती )
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी टोकन सिस्टीम
एवढी मोठी गर्दी सांभाळणे प्रशासनासाठी कठीण झाले होते. त्यामुळे कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनने काही कडक नियम लागू केले आहेत. आता शोरूममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी टोकन सिस्टीम सुरू करण्यात आली आहे.
ज्यांच्याकडे टोकन असेल, त्यांनाच आत सोडले जात आहे. तसेच एका ग्राहकाला फक्त एकच साडी खरेदी करता येईल, असा नियमही करण्यात आला आहे. यामुळे जास्तीत जास्त लोकांना खरेदीची संधी मिळेल आणि प्रक्रियेत पारदर्शकता राहील, असा यामागचा उद्देश आहे.
( नक्की वाचा : 'हम दिल दे चुके सनम'चा थरार! बायकोला प्रियकरासोबत रंगेहात पकडलं अन् मग मंदिरात जे घडलं ते पाहून गाव हादरलं )
म्हैसूर सिल्कची एवढी क्रेझ का?
म्हैसूर सिल्कच्या या वेडामागे केवळ सौंदर्य नाही, तर त्याची दुर्मिळता हे देखील एक मोठे कारण आहे. कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनकडे या साड्यांचे अधिकृत जीआय टॅग आहे. याचा अर्थ असा की, केवळ याच संस्थेला अस्सल म्हैसूर सिल्क बनवण्याचा अधिकार आहे.
या साड्यांचे उत्पादन अतिशय संथ गतीने आणि कौशल्याने केले जाते. शुद्ध सोन्याची जरी आणि मऊ पोत ही या साड्यांची ओळख आहे.
उत्पादनातील आव्हाने आणि तुटवडा
या साड्यांचा बाजारात प्रचंड तुटवडा आहे कारण त्याच्या निर्मितीसाठी लागणारे कुशल कामगार खूप कमी आहेत. एका नवीन कारागिराला तयार करण्यासाठी साधारण 6 ते 7 महिने प्रशिक्षण द्यावे लागते.
गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये म्हणून सर्व उत्पादन फक्त सरकारी केंद्रांमध्येच केले जाते. कारागिरांची कमतरता आणि वाढती मागणी यामुळे या साड्या मिळवण्यासाठी ग्राहकांना अक्षरशः युद्धासारखी परिस्थिती अनुभवावी लागत आहे. पहाटेपासून रांगेत उभे राहून ही साडी मिळवणे अनेकांसाठी अभिमानाची गोष्ट ठरत आहे.
इथे पाहा VIDEO