महानगरामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी आता रॅपिडोचा (Rapido) वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणत्याही भागात वेगवान सर्व्हिस देण्याची जाहिरात या कंपनीकडून केली जाते. दुचाकी वाहन असल्यानं ट्रॅफिक जाममधूनही हे ड्रायव्हर वाट काढू शकतील, असा ग्राहकांचा दावा असतो. पण, याच रॅपिडो ड्रायव्हरच्या मुजोरीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे व्हिडिओ?
बंगळूरुमधील जयनगर येथून एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका रॅपिडो बाईक ड्रायव्हरनं (Rapido Driver Slaps Women In Bengaluru) एका महिला प्रवाशाला मारहाण केल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान मध्येच उतरल्यानंतर महिलेने बाईक चालकाच्या निष्काळजीपणाबद्दल आक्षेप घेतला होता. मात्र, दोघांमध्ये योग्य संवाद न झाल्याने वाद वाढला.
ती महिला फक्त इंग्रजी बोलत होती, तर दुसरीकडे रॅपिडो चालकाला फक्त कन्नड येत होते. महिलेने कथितरित्या भाडे देण्यास आणि हेल्मेट परत करण्यास नकार दिल्यानंतर परिस्थिती चिघळली. यानंतर व्हिडिओमध्ये ड्रायव्हर महिलेला थप्पड मारताना दिसत आहे, ज्यामुळे ती जमिनीवर पडली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, सुरुवातीला दोघेही वाद घालताना आणि आसपास उभे असलेले लोक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्या व्यक्तीने थप्पड मारल्यानंतरही कोणीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.
( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash: मुलाला वाचवण्यासाठी आगीची पर्वा न करणारी आई, 'हा' Video पाहून अंगावर येईल काटा )
पोलिसांच्या सूत्रांनुसार, त्यांनी महिलेला एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आवाहन केले, परंतु तिला हे प्रकरण पुढे वाढवायचे नव्हते. या घटनेची अदखलपात्र तक्रार (non-cognizable report) दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.