Rare Medical Miracle: नव्या मुलाचं आगमन ही कोणत्याही घरातील आनंदाची घटना असते. नव्या बाळाच्या आगमानानं घरातील वातावरण बदलतं. काही घरात एकाच वेळी दोन म्हणजेच जुळ्या बाळाचा जन्म होतो.काहीच वेळा एकाचवेळी तीन म्हणजेच तिळ्या मुलाचा जन्म होतो. पण एकाच वेळी चार मुलांचा जन्म ही एक अत्यंत दुर्मीळ घटना आहे. अशीच एक घटना नुकतीच घडली आहे.
मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून एक अत्यंत आनंदाची आणि दुर्मिळ बातमी समोर आली आहे. इथे एका 29 वर्षीय महिलेने एकाच वेळी चार मुलांना जन्म दिला आहे. यामध्ये तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. इंदूरच्या श्री इंदूर क्लॉथ मार्केट हॉस्पिटलमध्ये ही 'चमत्कारी' डिलिव्हरी झाली.
डॉक्टरांनी काय सांगितलं?
हॉस्पिटलचे वैद्यकीय प्रशासक डॉ. आदित्य सोमानी यांनी माहिती दिली की, आई आणि चारही बाळांच्या सुरक्षिततेसाठी डॉक्टरांनी सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. एक तास चाललेल्या या आव्हानात्मक ऑपरेशनमध्ये चारही बाळांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
( नक्की वाचा : Cab Driver : 'भैय्या' म्हणू नका... ' कॅब ड्रायव्हरने कारमध्ये प्रवाशांसाठी लावले 6 'कडक' नियम, चर्चा तर होणारच )
डॉ. सोमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जन्माला आलेल्या या नवजात बालकांचे वजन 800 ग्रॅम्स ते 1.5 किलोग्रॅम्स दरम्यान आहे. हॉस्पिटलच्या नोंदीनुसार, त्यांच्या रुग्णालयात एका महिलेने चौघांना जन्म देण्याची ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे, आई आणि तिची चारही बाळं पूर्णपणे ठीक असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
चौघांना जन्म देणे (Quadruplets) ही घटना खूपच दुर्मिळ मानली जाते. नैसर्गिकरित्या, दर 7 लाख जन्मांपैकी केवळ एकावेळी चौघांना जन्म देण्याची शक्यता असते. त्यामुळे ही घटना खरोखरच 'निसर्गाचा चमत्कार' मानली जात आहे.