- सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात लहान मुलगी दणकट पुरुष पैलवानाला सहज चितपट करते
- या मुलीने कुस्तीच्या मैदानावर आपली चपळता आणि आत्मविश्वास दाखवून प्रेक्षकांना थक्क केले आहे
- मुलगी डान्स करत पैलवानाला फसवून दोन वेळा उचलून आपटल्याने तो गोंधळून मैदानातून पळाला
Little Girl Wrestler Viral Video: कुस्तीच्या मैदानात पुरुषांचेच वर्चस्व, पुरुषांचीच सत्ता असा समज आता मागे पडला आहे. पुरुषांप्रमाणेच अनेक दंगल गर्ल आता कुस्तीत नाव कमावताना, भल्याभल्या पैलवानांना चितपट करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक कुस्तीच्या मैदानातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका लहान मुलीने तिच्यापेक्षा दणकट पुरुष कुस्तीपटूला बघता बघता चितपट केले, शेवटी त्याला मैदान सोडून पळावे लागले. माध्यमांवर हा व्हिडिओने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.
चिमुकलीची कमाल, पैलवानाला पळवून लावलं!
आमिर खानचा दंगल चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटात मुलींनी चक्क पुरुष पैलवानांना आस्मान दाखवल्याचा सीन होता, ज्याची जोरदार चर्चा झाली. सध्या सोशल मीडियावर एका रियल दंगल गर्लच्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ही चिमुकली मुलगी कुस्तीच्या मैदानात दणकट पुरुषासोबत दोन हात करते अन् बघता बघता त्याला चितपटही करते. चिमुकलीची ही चपळता पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, छोटी मुलगी मजबूत शरीरयष्टी असलेल्या पुरुष पैलवानासोबत कुस्ती धरत आहे. कुस्ती सुरु होताच मुलगी डान्स करत करतच पैलवानाला फसवते अन् क्षणात त्याचा हात पकडून दोन वेळा उचलून आपटते. मुलीची ही चपळता अन् दोन वेळा चितपट केल्याचे पाहताच तरुण पैलवान गोंधळतो अन् मैदानातून बाहेर पळतो. छोट्या मुलीची चपळता आणि आत्मविश्वास इतका जबरदस्त होता की तो पैलवान थक्क झाला. स्वतःचा पराभव आणि प्रेक्षकांचा हशा पाहून तो थेट मैदान सोडूनच पळाला.
वास्तविक ही कुस्ती मैत्रिपूर्ण लढत म्हणून केली गेली होती, मात्र अशातही मुलीने आपली कला दाखवत प्रेक्षकांनाही थक्क केले. या चिमुकल्या पैलवानाने मोठ्या पैलवानाला धुळ चारल्याने प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. सामना सुरू होताच काही सेकंदांतच या छोट्या चॅम्पियनने बाजी पलटवली. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून चिमुकलीचे कौतुक केले आहे. अनेकांनी खरीखरी दंगल गर्ल असे म्हणत तिला शाबासकीही दिली आहे.