Kelvan In Mumbai Local Train Viral Video: मुंबईकरांच्या दैनंदिन जगण्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे लोकल ट्रेन. ऑफिसची धावपळ, घरी जाण्याची घाई... अशा प्रत्येक प्रवासात मुंबईकरांना लोकलचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळेच प्रत्येक मुंबईकराच्या मनात लोकलबाबत हळव्या आणि तितक्याच गोड आठवणी असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दररोज लोकलमधून प्रवास करणाऱ्या मैत्रिणींनी असं काही केलं की माध्यमांवर त्याची तुफान चर्चा होत आहे.
नेमकं काय केलं?
लग्नाआधी साजरा केला जाणारा कार्यक्रम म्हणजे केळवण.. लग्न ठरलेल्या तरुण- तरुणीला घरी बोलावून जेवणाचा बेत आखण्याची पद्धत आहे, ज्याला केळवण म्हणतात. अनेकदा रोजच्या धावपळीमुळे घरी बोलावूण केळवण करणे शक्य होत नाही. मुंबईसारख्या धावत्या शहरात तर असा निवांत वेळ मिळणे कठीणच. पण यावरही मार्ग शोधत मुंबईमधील काही महिला मंडळींनी आपल्या मैत्रिणीचे थेट लोकल ट्रेनमध्येच केळवण केले.
या केळवणासाठी लोकलचा डबा सजवण्यात आला. केळीची पाणे, फुले, हार लावून सुंदर सजावट केली. होणाऱ्या नवरीसाठी गोडधोड पदार्थही बनवण्यात आलेत. सर्व मैत्रिणींनी केक कापून जेवण खाऊ घातले. सर्वांनी फोटोसेशन करत नव्या नवरीला शुभेच्छा अन् गिफ्टही दिलेही. असेही एक केळवण म्हणत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रियाही दिल्यात. एक केळवण असेही! मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये केळवण, हा विचार फक्त मुंबईच्या स्त्रियाच करू शकतात आणि फक्त विचारच नव्हे तर ते चांगलं पणे execute पण केले, असे म्हणत नेटकऱ्यांनी या मैत्रिणींचे कौतुक केले आहे. दरम्यान, लोकलमध्ये केळवण साजरा करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेक सण मुंबईच्या लोकलमध्ये अगदी दणक्यात साजरे करण्यात आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world