Jaypur News: वैद्यकीय क्षेत्रात अनेकदा थक्क करणाऱ्या घटना समोर येत असतात, मात्र जयपूरमधील एका खासगी रुग्णालयात नुकतीच झालेली शस्त्रक्रिया पाहून अनुभवी डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. एका २६ वर्षीय तरुणाच्या पोटात चक्क सात टूथब्रश आणि लोहेरी कामासाठी वापरले जाणारे दोन 'पाने' (Wrenches) अडकले होते. तब्बल दोन तासांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर हे साहित्य बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
पोटदुखीमुळे त्रस्त तरुण दवाखान्यात गेला..
समोर आलेल्या माहितीनुसार, भीलवाडा येथील रहिवासी असलेला हा तरुण २६ डिसेंबर रोजी तीव्र पोटदुखीच्या तक्रारीमुळे रुग्णालयात दाखल झाला होता. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. ज्येष्ठ गॅस्ट्रो सर्जन डॉ. तन्मय पारीक यांनी तपासणी केली असता, सोनोग्राफी अहवालात पोटात काही धातूच्या आणि प्लास्टिकच्या वस्तू असल्याचे निदर्शनास आले.
Trending News: कॅनडातील मध्यमवर्गीयांचे जीवन भारतापेक्षा 10 पटीने सरस? 'त्या' व्हिडिओने नवा वाद
पोटातून निघाले असं साहित्य...
सुरुवातीला एंडोस्कोपीद्वारे या वस्तू काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र वस्तूंचा आकार आणि त्यांचे स्वरूप पाहता तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. अखेर डॉक्टरांनी 'ओपन सर्जरी' करण्याचा धाडसी निर्णय घेतला.डॉ. पारीक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आलोक वर्मा आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया पूर्ण केली.
या तरुणाची मानसिक स्थिती स्थिर नसल्याने त्याने या वस्तू गिळल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्या मानसिक आरोग्यावरही उपचार केले जात आहेत.