केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. राजकीय सभा, बैठका तसंच संसदेमध्येही त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचा अनुभव सर्वांनी घेतला आहे. पण, एका कौटुंबीक कार्यक्रमात त्यांचं हे रुप सर्वांना दिसलं. नेहमी विरोधकांची कानउघाडणी करणारे अमित शाह यांनी यावेळी त्यांचा मुलगा जय शाह (Jay Shah) यांनाच सुनावलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय झालं?
केंद्रीय गृहमंत्री त्यांच्या सर्व कुटुंबीयांसह मंगळवारी अहमदाबादमधील जगन्नाथ मंदिरात गेले होते. मकर संक्रातीच्या दिवशी उत्तरायण सुरु होते. त्या निमित्तानं अमित शाह यांनी सहकुटुंब मंदिरात पूजा केली. अमित शाह यांचे चिरंजीव तसंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलचे (ICC) संचालक जय शाह देखील यावेळी उपस्थित होते.
अमित शाह यांनी पूजा झाल्यानंतर सर्वांसमोर निरंजन पुढं करत आरती देत होते. त्यावेळी आरतीच्या प्रकाशापासून जय शाह यांनी त्यांच्या लहान बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला. जय शाह यांची ती कृती अमित शाह यांना आवडली नाही. त्यांनी तातडीनं जय शाहांना सुनावलं.
'कस्सू नाय ठाय, तारे काई नवो नको छोकरो चे' असं त्यांनी गुजरातीमध्ये जय शाह यांना सुनावलं. याचा मराठीमध्ये साधारण अर्थ हा 'काही होणार नाही, तुझा मुलगा स्पेशल आहे का?' असा होतो. अमित शाह आणि जय शाह यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अमित शाह यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. त्यावर नेटीझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
कोण आहेत जय शाह?
36 वर्षांच्या जय शाह यांनी 1 डिसेंबर 2024 रोजी आयसीसी संचालकपदाचा कार्यभार स्विकारला आहे. ते सर्वात तरुण आयसीसी संचालक आहेत. आसीसी संचालक होण्यापूर्वी ते बीसीसीआयचे सचिव होते. आयसीसी संचालक झालेले ते पाचवे भारतीय आहेत. यापूर्वी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या चार भारतीयांनी आयसीसीचं नेतृत्त्व केलं आहे.
( नक्की वाचा: Jay Shah : जय शहांना ICC कडून किती मिळणार पगार? BCCI कडून किती मिळत होते पैसे? )
जय शाह यांचं 2015 साली रिशिता पटेल यांच्याशी विवाह झाला. जय शाह यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांचा मुलगा सर्वात लहान असून त्याचा जन्म नोव्हेंबर 2024 मध्ये झाला आहे.