Shivraj Singh Chauhan dance video : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या आनंदी मुडचे फोटो आणि एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये शिवराज मामा म्हणून प्रसिद्ध असलेल्या केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या या फोटोंची सध्या जोरदार चर्चा आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये शिवराज सिंह चौहान हे त्यांची पत्नी साधना सिंहसोबत 'जट यमला पगला दिवाना' या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.
शिवराज सिंह यांचा लहान मुलगा कुणाल सिंह चौहान याच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमात शिवराज सिंह चौहान यांनी या लोकप्रिय हिंदी गाण्यावर नाच केला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मीडिया नेटवर्क X वर खास पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हंटलं आहे की, आज मुलगा कुणालच्या लग्नानिमित्तानं सनातन धर्माच्या परंपरेनुसार विधीपूर्वक मंडपची स्थापना करण्यात आली. मी, माझी पत्नी साधना आणि मुलगा कुणाल यांच्यासह षोडशोपचार पद्धतीने वेदमंत्रांनी पूजा केली.
श्रीगणेश, अंबिका आणि वरुण यांच्या पूजेबरोबरच ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, कूर्म, अनंत, वराह, विश्वकर्मा आणि वास्तुदेव यांची पूजा करण्यात आली
शिवराज सिंह चौहान यांनी अन्य एका पोस्टमध्ये लिहिलं की, लग्नात हळदी समारंभाला विशेष महत्त्व आहे. आज, सर्व मातृवर्ग आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांनी मुलगा कुणालला त्याच्या आरोग्यासाठी, समृद्धीसाठी आणि सुखी वैवाहिक आयुष्यासाठी हळद लावली.
हळद लावल्यानंतर काकूंनी शुभ संरक्षक धागा बांगडीला बांधून आशीर्वाद दिला. सुमधुर संगीत, आनंद आणि कुटुंबीयांच्या प्रेमळ उपस्थितीने संपूर्ण कार्यक्रम पार पडला.