ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना या नवीन नाहीत. विशेषत: पावसाळ्यात साप बाहेर आल्यानं हे प्रकार वाढतात. पण एका 24 वर्षांच्या तरुणाला गेल्या 40 दिवसात 7 वेळा साप चावला आहे. विकास दुबे असं या तरुणाचं नाव असून तो उत्तर प्रदेशच्या फत्तेपूरचा रहिवाशी आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे आपल्याला दर शनिवारी साप चावत असल्याचा विकासचा दावा आहे. सतत होणाऱ्या सर्पदंशामुळे हा तरुण घाबरलेला असून त्यानं सर्पदंशावरील उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फत्तेपूरचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी राजीव नयन गिरी यांनी ANI शी बोलताना सांगितलं की, 'पीडित तरुण आमच्या कार्यलायात येऊन मदतीची याचना करत रडत होता. सहावेळा सर्पदंश झाल्यानंतर त्यावरील उपचारासाठी त्यानं बरेच पैसे खर्च केले आहेत. त्यानंतर आता पुढील उपचारासाठी त्यांनी आम्हाला विनंती केली. आम्ही त्याला सरकारी हॉस्पिटमध्ये उपचार घेण्याचा सल्ला दिला. सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्पदंशावरील उपचार मोफत होतात.'
स्वप्नात मिळला इशारा
विकासनं एका स्थानिक वृत्तवाहिनीला बोलताना सर्पदंशाची पूर्ण कहाणी सांगितली आहे. विकासला 2 जून रोजी पहिल्यांदा सर्पदंश झाला. त्यानंतर सलग चारवेळा त्याला शनिवारीच सर्पदंश झाला. सतत होणाऱ्या या प्रकारामुळे विकास मावशीच्या घरी राहयाला गेला. तर मावशीच्या घरीही सापानं त्याचा पिच्छा सोडला नाही. मावशीच्या घरी सर्पदंश झाल्यानंतर घाबरलेला विकास पुन्हा घरी आला. तर त्यानंतर पुन्हा घरात त्याचा सापानं चावा घेतला.
( नक्की वाचा : साप तरूणाला एकदा चावला 'तो'सापाला दोनदा चावला, साप मेला तो वाचला )
आपल्याला सर्पदंशाची माहिती आधीच मिळते. आपण त्याबाबत घरांच्यानाही सांगतो. आपल्याला एकूण 9 वेळ साप चावणार आहे, असा इशारा स्वप्नात मिळाला आहे. नवव्यांदा साप चावल्यानंतर कोणतेही उपचार मला वाचवू शकणार नाहीत. माझा मृत्यू अटळ आहे, असा इशारा स्वप्नात मिळाला असल्याचं विकासनं सांगितलं.
चौकशी समितीची स्थापना
'जिल्हा वैद्यकीय अधिकारी राजीव नयन गिरी यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष टीमची स्थापना केली आहे. 'एखाद्या व्यक्तीला दर शनिवारीच साप चावतो. त्यानंतर तो सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार न घेता एका खासगी हॉस्पिटलमध्येच नेहमी उपचारासाठी भरती होतो. त्यानंतर तो एका दिवसात लगेच बरा होतो, हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचं गिरी यांनी सांगितलं. त्यामुळेच या प्रकरणात विशेष टीम स्थापन केली असून ही टीम 3 दिवसांमध्ये रिपोर्ट सादर करेल,' असं गिरी यांनी स्पष्ट केलं.