Viral Video: शाळा ही अशी जागा असते, जेथे सर्व मुले एकसारखाच गणवेश परिधान करतात, येथे कोणीही लहान-मोठे नसते. भेदभाव आणि परकेपणापासून दूर राहून मुलांना एकता आणि समानतेचे धडे शाळेत दिले जातात. राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील मुलांनी असेच माणुसकीचे उत्तम दर्शन घडवलंय. शाळेतील एका कॅन्सरग्रस्त विद्यार्थिनीचे थेरपीमुळे केस गळाले, तेव्हा वर्गातील सर्व मुलांनीही स्वतःचे मुंडण करून घेतले. एवढेच नाही तर शिक्षकांनीही आपले केस कापले. मुंडण केलेल्या या मुलांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कॅन्सरग्रस्त मुलीचे थेरपीनंतर केस गळाले होते. तिचा आत्मविश्वास टिकवून राहावा तसेच एकजुटीचे दर्शन घडवण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही मुंडण केले.
पाहा व्हिडीओ
विद्यार्थिनीचा कॅन्सर आजाराविरोधात लढा
सोशल मीडियावर हा हृदयस्पर्शी व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या व्हिडीओमध्ये मुंडण केलेले शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक दिसत आहेत. सोशल मीडियावरील दाव्यानुसार हा व्हिडीओ जोधपूरमधील एका शाळेचा आहे. येथे शाळेतील एक मुलगी कॅन्सरशी झुंज देतेय. कॅन्सरच्या उपचारादरम्यान केमोथेरपीमुळे तिच्या डोक्यावरील केस गळाले. त्यामुळे ती मुलगी खूपच त्रस्त आणि निराश दिसत होती. तिचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी तिच्यासाठी मुंडण केलं.
(नक्की वाचा: Viral Video: झाडेझुडपे कसा श्वास घेतात? कॅमेऱ्यात पहिल्यांदाच कैद झाले अद्भुत दृश्य)
एकतेचे उत्तम दर्शन
रिपोर्टनुसार, केस गळाल्यामुळे कॅन्सरग्रस्त विद्यार्थिनी नैराश्यात होती. तिला एकटेपणा जाणवू लागला, म्हणून विद्यार्थी आणि शिक्षकांनी हा निर्णय घेतला. वर्गामध्ये केवळ तिच्या एकटीच्याच डोक्यावर केस नाहीत, असे तिला वाटू नये. त्यामुळे शाळेतील सर्व वर्गमित्रांनी मुंडण करून घेतले. ही घटना माणुसकीचे उत्तम उदाहरण आहे. दरम्यान हा व्हिडीओ नेमक्या कोणत्या शाळेतील आहे, याबाबतची माहिती समोर आलेली नाही.