Young Vendor Viral Video: रेल्वे स्टेशन, बस स्थानकावर फेरीवाले साहित्य विकून आपला उदरनिर्वाह करत असतात. येणा- जाणाऱ्या प्रवाशांना गरजेच्या वस्तू पुरवत आपल्या कुटुंबाचे पोट भरतात. अनेकदा या विक्रेत्यांसोबत प्रवासी गैरवर्तन करतात, मारहाणही करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
नेमकं काय घडलं?
एका रेल्वे स्टेशनवर विक्रेत्याने प्रवाशाला साहित्य दिल्यानंतर तो पैसे देण्यास टाळाटाळ करतो. ट्रेन प्लॅटफॉर्मवरुन सुटते तरीही तो प्रवासी पैसे देत नसल्याने तरुण त्याच्याकडे पैशाची मागणी करत ट्रेनसोबत धावताना दिसत आहे. संबंधित प्रवासी डब्यात बसलेला असताना, तरुण हताशपणे हाताने इशारा करत त्याला वारंवार पैसे देण्यासाठी विनंती करतो. मात्र ट्रेनमध्ये बसलेला निर्दयी प्रवासी त्याला पैसे देत नाही.
आपल्या मेहनतीचे, कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी या तरुणाला अशरक्ष: जीव धोक्यात घालून ट्रेनसोबत पळावे लागते मात्र त्याला शेवटपर्यंत पैसे मिळत नाहीत. शेवटी ती ट्रेन प्लॅटफॉर्मवरुन जाते आणि हताश निराश तरुण धापा टाकत उभा राहतो. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या व्हिडिओने नेटकऱ्यांनाही भावुक केले आहे तसेच ट्रेनमध्ये बसलेल्या निर्दयी प्रवाशावर संताप व्यक्त केला आहे.
आपल्या मेहनतीचे पैसे न मिळाल्याचं दुःख या मुलाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. ट्रेनमध्येच बसलेल्या एका प्रवाशाने हा व्हिडिओ शूट केला आहे. रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तीला त्याची दुर्दशा समजते आणि तो स्वतः पैसे पाठवू शकेल म्हणून त्याचा फोन नंबर मागतो. पण त्यावेळी विक्रेत्याची एकमेव चिंता प्रवाशाकडून त्याचे पैसे परत मिळवणे होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच लोक संताप व्यक्त करत असून या मुलाला त्याच्या मेहनतीचे फळ मिळावे म्हणून प्रार्थना करत आहेत.