AI beats human lawyer : तंत्रज्ञानाच्या जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आतापर्यंत फोटो तयार करणे किंवा मजकूर लिहिण्यापुरता मर्यादित असलेला एआय आता थेट न्यायालयात पोहोचला आहे. ब्रिटनच्या एका न्यायालयात एआयने एक नवा इतिहास रचला आहे. ब्रिटनमधील एका लॉ फर्मच्या गारफील्ड एआय चॅटबॉटने चक्क एका हाडामांसाच्या मानवी वकिलाला कोर्ट ट्रायलमध्ये पराभूत केले आहे.
जगाच्या इतिहासात एआय चॅटबॉटने मानवी वकिलाचा पराभव करून कोर्टात केस जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. कायदेशीर कागदपत्रे तयार करण्यात तज्ज्ञ असलेल्या या एआय चॅटबॉटने आपल्या क्लायंटच्या बाजूने सलग 3 तास विरोधी पक्षाच्या मानवी वकिलाशी वाद घातला आणि शेवटी 9 लाख रुपयांची ही केस जिंकली.
काय आहे प्रकरण?
एका फ्रीलान्स ह्युमन रिसोर्स एक्झिक्युटिव्ह टॅमिरेस कॅमल टॅक्विडीर यांनी एका हॉस्पिटॅलिटी बिझनेस विरोधात थकीत फीसाठी न्यायालयात खटला दाखल केला होता. हा खटला लढण्यासाठी त्यांनी गारफील्ड एआय चॅटबॉटला 400 पौंड म्हणजेच सुमारे 50252 रुपये देऊन हायर केले होते.
या एआय चॅटबॉटने स्मॉल क्लेम कोर्टात 7000 पौंड म्हणजेच जवळपास 8.79 लाख रुपयांची ही केस जिंकून आपल्या क्लायंटला मोठी थकबाकी मिळवून दिली. जर या कामासाठी मानवी वकील हायर केला असता, तर क्लायंटला लाखो रुपये खर्च करावे लागले असते, मात्र एआयमुळे हा खर्च अगदी कमी पैशात झाला.
( नक्की वाचा : Earthquake Alert : भूकंप येण्यापूर्वीच मोबाईलवर येणार मेसेज! गूगलच्या नव्या सिस्टीममुळे लाखो प्राण वाचणार? )
अशी चालली कोर्टातील संपूर्ण प्रक्रिया
गारफील्ड एआय चॅटबॉटला गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ब्रिटनच्या सॉलिसिटर्स रेग्युलेशन ऑथॉरिटीकडून मंजुरी मिळाली होती. या केसमध्ये एआय चॅटबॉटने स्वतः संपूर्ण केस स्टडी करून कायदेशीर कागदपत्रे तयार केली. यामध्ये 4 साक्षीदारांचे जबाब आणि आवश्यक पुराव्यांचा समावेश होता.
कोर्टात ट्रायल सुरू होण्यापूर्वी या एआय चॅटबॉटने वन एसेक्स कोर्टातील एका कनिष्ठ बॅरिस्टर डोमिनिक ली यांना कोर्टात बाजू मांडण्यासाठी हायर केले. वँड्सवर्थ काउंटी कोर्टात सलग 3 तास दोन्ही बाजूंच्या बॅरिस्टरांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने गारफील्ड एआय चॅटबॉटने तयार केलेल्या पुराव्यांच्या आधारे त्याच्या बाजूने निकाल दिला.
एआय लॉ फर्मची ऐतिहासिक कामगिरी
या ऐतिहासिक विजयानंतर गारफील्ड एआय लॉ फर्मचे सह-संस्थापक फिलिप यंग यांनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, कायदा आणि न्याय क्षेत्रात ही एक खूप मोठी आणि ऐतिहासिक कामगिरी आहे. गारफील्ड एआयने मानवी सॉलिसिटर्सच्या विरोधात आपली पहिली ट्रायल जिंकली आहे.
ब्रिटनच्या कायदेशीर क्षेत्रात सध्या एआयचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र गारफील्ड एआय वकील आज विशेष चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, या सिस्टीमच्या मदतीने कोर्टात सादर केलेले डॉक्युमेंट्स आणि दलीली अत्यंत अचूक आणि प्रभावी ठरल्या.
काय आहे गारफील्ड एआय?
गारफील्ड एआय हा एक विशेष लॉ चॅटबॉट आहे, ज्याची स्थापना फिलिप यंग यांनी केली आहे. पूर्णपणे एआयच्या माध्यमातून कायदेशीर सेवा देणारी ही जगातील पहिलीच मान्यताप्राप्त लॉ फर्म आहे. ही फर्म पारंपरिक वकिलांच्या फर्मपेक्षा वेगळी असून ती प्रामुख्याने स्मॉल क्लेम्स कोर्टातील केसेस हाताळते. यामध्ये 10000 पौंड म्हणजेच साधारण 12.5 लाख रुपयांपर्यंतच्या छोट्या कर्जाच्या आणि थकबाकीच्या दाव्यांची वसुली करण्यासाठी कायदेशीर मदत केली जाते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world