अमेरिकेला निघाले रशियामध्ये उतरले! AIR India चे 225 प्रवासी का अडकले?

दिल्लीहून सन फ्रँसिस्कोला जाणारं एअर इंडियाचं विमान गुरुवारी रात्री रशियातील क्रास्नोयार्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर (KJA) उतरवण्यात आलं आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

दिल्लीहून सन फ्रँसिस्कोला जाणारं एअर इंडियाचं विमान गुरुवारी रात्री रशियातील क्रास्नोयार्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर (KJA) उतरवण्यात आलं आहे. एअर इंडियाचं AI183 हे विमान तांत्रिक अडचणीमुळे क्रास्नोयार्स्क विमानतळाकडं वळवण्यात आलं. विमानात 225 प्रवासी आणि 19 क्रू मेंबर होते. त्यांना तिथून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण, ते इतकं सोपं नाही.


एअर इंडियानं एक ट्विट करुन याबाबत येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. 'क्रास्नोयार्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाचा स्वत:चा स्टाफ नाही. त्यामुळे आम्ही प्रवाशांना आवश्यक मदत देण्यासाठी इतर (थर्ड पार्टी) व्यवस्था करत आहोत. एअर इंडिया सातत्यानं सरकारी एजन्सींच्या संपर्कात आहोत. सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची आम्हाला काळजी आहे. आम्ही त्यांना लवकरात लवकर क्रास्नोयार्स्कहून (KJA) सन फ्रँसिस्कोला नेण्यासाठी विमानाची व्यवस्था करत आहोत.'  

Advertisement

एअर इंडियाच्या या स्पष्टीकरणावर प्रवाशांची नाराजी आहे. 'केव्ही कृष्णा राव या प्रवाशानं सोशल मीडियावर ही नाराजी व्यक्त केलीय. आम्ही विमानतळार अडकलोय. आम्हीला कोणतीही सुविधा मिळत नाहीय. आमच्याकडं काहीही खायला नाही. आम्हाला कोणतंही अपडेट दिलं जात नाहीय,' असं त्यांनी म्हंटलं आहे. 

आणखी एका प्रवाशांची नातेवाईक प्राची जैन यांनी विमानतळावर पाणी आणि खाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचं सांगितलंय. माझ्या आई-वडिलांना पावसात भिजल्यानं थंडी वाजत आहे. ते उपाशी आहेत, त्यांना विचारणारं कुणी नाही अशी तक्रार त्यांनी केलीय. 

Advertisement

आणखी एक नातेवाईक मयंक गुप्ता यांनी सांगितलंय, 'माझी आई आजारी आहे. तिचं सामान आणि औषधं विमानात आहेत. 70 वर्षांपेक्षा मोठ्या असलेल्या वृद्धांना या प्रकारची वागणूक योग्य नाही. मला अतिशय वाईट वाटतंय. तसंच रागही येत आहे.' 

Advertisement

एका वर्षात दुसरी वेळ

एअर इंडियाच्या विमानाची रशियामध्ये एमर्जंसी लँडींग करण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात दिल्लीहून सन फ्रँसिस्कोहून जाणाऱ्या एअर इंडियाचं AI195 विमानाला रशियातील मगदान विमानतळातवर उतरवण्यात आलं होतं. या विमानात 16 कर्मचारी आणि 216 प्रवासी होते. जवळपास 40 तास हे प्रवासी या विमानतळावर अडकले होते.

विमानाच्या मार्गात ऐनवेळी बदल होणे हा एक सामान्य प्रकार आहे. वेगवेगळ्या उड्डाणांच्या दरम्यान तांत्रिक अडचणी, खराब हवामान, विमानात उपचाराची आप्तकालीन परिस्थिती, विमानतळ बंद असणे यासारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे मार्गामध्ये बदल करावा लागतो. ज्या विमानतळावर एअरलाईन्सची स्वत:ची व्यवस्था नसेल तिथं प्रवाशांना सुविधा देण्यासाठी स्थानिक यंत्रणांची मदत घेतली जाते. 

( नक्की वाचा : तरुणांमध्ये वाढत असलेला Boysober रिलेशनशिप ट्रेंड काय आहे? यामध्ये मुलं-मुली काय करतात? )
 

रशियात अडचण काय?

2022 पासून सुरु असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे रशियातील अनेक भागात विमानांना बंदी घालण्यात आली आहे. एअर इंडिया, अमिरात आणि तुर्की सारख्या मोजक्याच एअरलाईन्सला रशियातील हवाई मार्गातून प्रवास करण्यास परवानगी आहे.

या निर्बंधामुळे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये व्यवस्था करण्यास तांत्रिक अडचणी येतात. त्याचबरोबर इन्शूरन्स देणाऱ्या कंपनींची मान्यता मिळणं देखील यामध्ये आवश्यक असते. त्यासाठी बरेच कागदी घोडे नाचवावे लागतात. इन्शूरन्स कंपनींना नियमांची अंमलबाजवणी करण्यासाठी तसंच त्यांच्या व्यवसायाला भविष्यात धोका निर्माण होऊ नये म्हणून बरीच कसरत करावी लागते. 

एअर इंडियाचं आता खासगीकरण झालं आहे. त्यानंतरही एअरलाईन्स या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयावर अवलंबून राहावं लागतं. भारताचा रशियामध्ये दुतावास आहे. पण, क्रास्नोयार्स्कमध्ये कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे सरकारला औपाचारिक आणि अनौपचारिक मदत करण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. 

एअर इंडियाला गेल्यावर्षी घडलेल्या घटनेचा अनुभव आहे. गेल्या वर्षी रशियामध्ये दोन दिवस विमान अडकलं होतं. यंदा एका दिवसामध्ये अडकलेल्या प्रवाशांची सूटका होईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )