Iran Vs America: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारिजानी यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. अमेरिकेवर पुन्हा एकदा 9/11 सारखा मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला जात असून, त्याचे खापर इराणवर फोडण्याचे षडयंत्र आखले जात असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मध्यपूर्वेतील युद्ध परिस्थिती अधिकच चिघळली असताना इराणचे वरिष्ठ नेते अली लारिजानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरून जगाला सावध केले आहे. अमेरिकेवर 9/11 च्या धर्तीवर मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणला जाऊ शकतो आणि त्याचा वापर इराणला लक्ष्य करण्यासाठी केला जाईल, असे लारिजानी यांनी म्हटले आहे.
लारिजानी यांचा दावा काय?
अली लारिजानी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "एपस्टीनच्या नेटवर्कमधील काही उरलेल्या सदस्यांनी अमेरिकेवर 9/11 सारखा हल्ला करण्याचा कट रचल्याची माहिती मला मिळाली आहे. या हल्ल्याचा दोष इराणवर देऊन इराणला आणखी अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. इराण अशा कोणत्याही दहशतवादी योजनांच्या विरोधात असून इराणचे अमेरिकेच्या जनतेशी कोणतेही युद्ध नाही", असेही अली लारिजानी यांनी स्पष्ट केले. लारिजानी यांनी ज्या 9/11 हल्ल्याचा उल्लेख केला, तो आधुनिक इतिहासातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला होता.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: रील स्टारचा क्रूर चेहरा! 50 लाखांसाठी निवृत्त प्राध्यापकाची हत्या; 40 दिवसांनी छडा)
11 सप्टेंबर 2001 रोजी अल-कायदाच्या 19 अपहरणकर्त्यांनी चार प्रवासी विमानांचा ताबा घेऊन वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉनला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात सुमारे 3000 लोकांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण करून इराणला युद्धाच्या खाईत लोटले जाईल, असा इराणचा दावा आहे.
युद्धाची भीषण परिस्थिती
गेल्या महिन्यात अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांनंतर हे युद्ध सुरू झाले आहे. या हल्ल्यात इराणचे 86 वर्षीय सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला, ज्यामुळे इराणमध्ये प्रचंड संताप आहे. पेंटागॉनच्या मते, आतापर्यंत इराणमधील 15,000 हून अधिक लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. या युद्धात आतापर्यंत 2000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये सर्वाधिक प्रमाण इराणी नागरिकांचे आहे. इराणनेही इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.
(नक्की वाचा : कल्याणमध्ये रात्री फिरताना अलर्ट राहा! 'या परिसरातील नागरिकांच्या घरांवर झाला सुतळी बॉम्ब हल्ला)
युद्ध अधिक तीव्र करण्यासाठी अमेरिकेने आपले 'USS Tripoli' ही युद्धनौका आणि 2500 मरीन कमांडो या भागात तैनात केले आहेत. अमेरिकेची ही वाढती लष्करी उपस्थिती इराणसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.