'All Eyes on Rafah' म्हणजेच राफावर सर्वांच्या नजरा... हे कॅप्शन असलेला फोटो तुम्ही सध्या सोशल मीडियावर अनेक ठिकाणी पाहिला असेल. सामान्य व्यक्तींपासून ते सेलिब्रेटिंपर्यंत अनेकांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर हे छायाचित्र शेअर केलंय. वाळवंटी भागात एका रचनेत बांधलेले खूप सारे तंबू आणि त्यावर लिहिलेलं 'All Eyes On Rafah' असा हा फोटो आहे. त्यानंतर #AllEyesOnRafah हा हॅशटॅगही सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. हा सर्व प्रकार पाहून याचा काय अर्थ आहे? ही जाहिरात मोहीम आहे की आणखी काही? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे अर्थ?
पॅलेस्टाईनमधील हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्याला इस्रायलकडून चोख उत्तर देण्यात आलं. ऑक्टोबर महिन्यात सुरु झालेला हा संघर्ष 7 महिन्यानंतरही सुरुच आहे. हमासनं शनिवारी इस्रायलमधील प्रमुख शहर तेल अवीववर रॉकेट हल्ला केला होता. त्यानंतर या संघर्षाची तीव्रता आणखी वाढलीय. इस्रायलनं उत्तरादाखल केलेल्या गझाच्या दक्षिण भागातील रफा या शहरावर केलेल्या हल्ल्यात किमान 45 जणांचा मृत्यू झालाय. अनेक लहान मुलांचाही त्यामध्ये समावेश आहे.
इस्रायलच्या हल्ल्यात विस्थापित झालेले गाझामधील अनेक नागरिक सध्या रफा शहरात आश्रयाला आहेत. आंतरराष्ट्रीय संघटनांनी याबाबत काळजी व्यक्त केल्यानंतरही इस्रायलनं रविवारी या भागात मोठा हल्ला केला. या हल्ल्यात या परिसरातील अनेक तंबूना आग लागली आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढली. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात एका इंधन टाकीचा स्फोट झाला त्यानंतर ही आग भडकली असं वृत्त NBC नं दिलंय.
( नक्की वाचा : भारताजवळ नवा देश तयार करण्याचा अमेरिकेचा प्लॅन? )
इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले तसंच जखमी झालेल्या नागरिकांची छायाचित्र सोशल मीडियावर शेअर होऊ लागताच जगभरातील मानवी हक्क संघटना तसंच कार्यकर्त्यांनी यावर काळजी व्यक्त केली. त्यानंतर 'All Eyes On Rafah' या कॅप्शनसह अनेकांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना शेअर केल्या. त्यामुळे हा ट्रेंड सुरु झाला. गाझा पट्टीतील परिस्थितीकडं लक्ष वेधण्यासाठी लिहिलेल्या पोस्टमध्ये हा हॅशटॅग वापरला जातोय.
कसा झाला उगम?
पॅलिस्टाईनमधील जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक रिकी पीपरकॉर्न यांच्या वक्तव्यानंतर हे वाक्य प्रचलित झालं. हमासचा बालेकिल्ला असलेलं रफा शहर निकामी करण्याचा आदेश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहून यांनी दिला होता. त्यानंतर पीपरकॉर्न यांनी फेब्रुवारीत हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतरच 'All Eyes On Rafah' ही वाक्यरचना प्रचलित झाली.
( नक्की वाचा : हमासचा इस्रायलवर पुन्हा रॉकेट हल्ला, एअर डिफेन्स सिस्टमचं प्रत्युत्तर )
फोटो खरा आहे?
हा फोटो कृत्रिम बुद्धीमत्तेच्या साधनांचा (AI-generated) वापर करुन केला असल्याची शक्यता आहे. या विषयावरचे अभ्यासक मार्क ओवेन जोन्स यांनी देखील AI नं तयार केलेला फोटो असू शकतो असा अंदाज व्यक्त केलाय. या फोटोमधील सावली नैसर्गिक वाटत नाही. त्याचप्रमाणे तंबूंची रचना देखील वास्तव वाटत नसल्याकडं त्यांनी लक्ष वेधलं.
कोणत्या सेलिब्रेटिंनी केला शेअर?
या फोटोच्या सत्यतेबद्दल शंका असली तरी अनेक भारतीय सेलिब्रेटींनी देखील या ट्रेंडची दखल घेत 'All Eyes On Rafah' हे कॅप्शन असलेलं छायाचित्र त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं. माधुरी दीक्षित, आलिया भट, वरुण धवन, समंथा राऊत प्रभू, तृप्ती डिमरीसह अनेक सेलिब्रेटिंनी हे छायाचित्र शेअर केलंय. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहनं देखील हे छायाचित्र शेअर केलं होतं. पण, तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग सहन करावं लागलं. त्यानंतर तिनं हे छायाचित्र डिलिट केलं. हे छायाचित्र शेअर करणाऱ्या अन्य सेलिब्रिटींनाही ट्रोलिंग सहन करावी लागतीय. माधुरी दीक्षितनंही काही तासांनी हा फोटो डिलिट करत ट्रोलिंगवर नाराजी व्यक्त केलीा., गेल्या 24 तासांमध्ये 29 दशलक्षवेळा 'All Eyes On Rafah' कॅप्शन असलेला फोटो शेअर करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : 'ती' कोण होती? महिलेसोबत फ्लॅटमध्ये जाताच फसले बांगलादेशचे खासदार, मृतदेहच बाहेर आला )
इस्रायलवर काय परिणाम?
हमासच्या ताब्यातील रफा शहराच्या परिस्थितीवर जगभरातून काळजी व्यक्त होतीय. सोशल मीडियावरही हा विषय ट्रेंडिंग आहे. त्यानंतरही इस्रायलचे या प्रदेशावर जोरदार हल्ले सुरुच आहेत. 'अल जझीरा'नं दिलेल्या माहितीनुसार हवाई हल्ले आणि तोफगोळांचा मारा यांच्या मदतीनं इस्रायली सैन्य रफा शहरामध्ये शिरलंय. या शहरातील एक वगळता सर्व हॉस्पिटल बंद आहेत.