योगेश पाटील, प्रतिनिधी
United States has fought 10 world wars in the last 25 years : इस्रायल आणि इराणमध्ये सध्या युद्ध सुरू आहे, पण इस्रायलच्या मदतीला आहे अमेरिका. याच अमेरिकेने गेल्या 25 वर्षात 10 महायुद्ध केली आहेत. परिणामी 10 देशांचा भूगोल आणि जागतिक राजकीय स्थिती पूर्णपणे बदलली आहे. पण अमेरिकेने या 10 देशांना का टार्गेट केलं, 25 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं, ज्याचा बदला अमेरिका आता पण घेतंय, पाहुयात यावरचा खास रिपोर्ट.
25 वर्षे...4 राष्ट्राध्यक्ष...10 देश...लक्ष्य एक...विध्वंस...
25 वर्षापूर्वी झालेला अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवरवर इस्लामिक दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. आणि यानंतर अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाची दिशा बदलली. या हल्ल्यानंतर अमेरिकेने गेल्या 25 वर्षात 10 देशांवर हल्ला केला, शत्रूचा खात्मा केला आणि बरंच काही मिळवत गेला. 9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं संपूर्ण जगभरात war on terror नावाखाली हल्ले केले आणि संपूर्ण जग बदलून गेलं. 2001 ते 2026 या 25 वर्षात अमेरिकेत चार राष्ट्राध्यक्ष बदलले पण लक्ष्य एकच होतं युद्ध. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी याला जागतिक लढा घोषित केलं. मधल्या काळात 3 राष्ट्राध्यक्ष आले पण लक्ष्य मात्र तेच राहिलं आणि आताचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील हेच लक्ष्य कायम ठेवल्याचं गेल्या 3 महिन्यातच दाखवून दिलं. 2001 नंतर अमेरिकेने किमान 10 देशांमध्ये लष्करी हल्ले, ड्रोन स्ट्राईक किंवा थेट बॉम्बहल्ले केले.
अमेरिकेची दहा महायुद्ध...
- अफगाणिस्तान
- इराक
- येमेन
- पाकिस्तान
- सोमालिया
- लिबिया
- सीरिया
- व्हेनेझुएला
- नायजेरिया
- इराण
या 10 देशांमध्ये अमेरिकेने हल्ले केले.
2001च्या हल्ल्यानंतर जॉर्ज बूश यांनी जगभरात war on terror ही मोहीम सुरू केली, हा निर्णय जागतिक पातळीवर किती महत्वाचा आणि काय गणितं आहेत? अमेरिकेच्या war on terror ची सुरूवात झाली ती अफगाणिस्तानपासून आणि तेही 9/11च्या हल्ल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच. 9/11 हल्ल्यामागे अल कायदा होती आणि त्याचा प्रमुख होता ओसामा बिन लादेन. अल-कायदाला आश्रय दिला होता अफगाणिस्तानच्या तालिबानने.
आणि यानंतर अमेरिकेने Operation Enduring Freedom अंतर्गत अफगाणिस्तानवर अनेक हल्ले केले. अफगाणिस्तानमध्ये लाखोंच्या संख्येने सैन्य, टँक, फायटर जेट्स पाठवले. तब्बल 2 दशकं अफगाणिस्तानच्या जमिनीवर अमेरिकेचं सैन्य होतं. तालिबान आणि अमेरिकेच्या सैन्यामध्ये शेकडो युद्ध झाली. हजारो मिसाईल अमेरिकेने अफगाणिस्तानच्या जमिनीवर डागल्या. पण अफगाणिस्तानमध्ये ओसामा बिन लादेन सापडलाच नाही.
अमेरिकेच्या निशाण्यावरचा दुसरा देश होता इराक...
जागतिक दहशतवादाविरोधात अमेरिकेने सुरू केलेल्या लढाईत अफगाणिस्ताननंतर इराक हा देश अमेरिकेच्या मिसाईलने सर्वाधिक होरपळला. अमेरिकेचा इराकविरोधात युद्ध करण्याचं प्रमुख कारण दहशतवादी गट होता असं बोललं जात असलं तरीही त्यामागे अनेक कारणं होती अशी चर्चा आहे आणि यातलं प्रमुख एक कारण म्हणजे तेलसाठे. इराक हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे तेलसाठे असलेला देश आणि केमिकल शस्त्रं. इराककडे महाविनाशक अशी केमिकल शस्त्रे होती. सततच्या तपासणीनंतरही सद्दाम हुसेन शस्त्रसाठा लपवत असल्याचा अमेरिकेचा आरोप होता. 20 मार्च 2003 रोजी अमेरिका आणि मित्र देशांनी इराकवर सैन्य हल्ला सुरू केला. अमेरिकेच्या मागणीनुसार इराकने आपली अनेक घातक शस्त्रे नष्ट केली. अखेर 13 डिसेंबर 2003 रोजी अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी त्याला एका बोगद्यातून अटक केली. सद्दामला दुजैल हत्याकांड प्रकरणात दोषी ठरवत 30 डिसेंबर 2006 रोजी फाशी देण्यात आली. इराकवर नियंत्रण मिळवून अमेरिका गल्फ प्रदेशात दीर्घकालीन तळ निर्माण करण्यात यशस्वी झाली. इराकमुळे इस्रायलला धोका होता तो धोका देखील कमी करत अमेरिकेने मैत्री जपली.
अफगाणिस्तान, इराकनंतर अमेरिकेच्या निशाण्यावर पाकिस्तान
सातत्याने भारताविरोधात कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करणारा पाकिस्तान हा अमेरिकेच्या हिटलिस्टवर होता आणि याचंही कारण होतं दहशतवाद. भारतात दहशतवादी पाठवून हल्ले करणाऱ्या पाकिस्तानची ओळख जागतिक पातळीवर देखील लँड ऑफ टेरेर अशीच आहे. 2004 ते 2018 तब्बल 14 वर्ष अमेरिकेने पाकिस्तानमध्ये अनेक मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले. पाकिस्तानच्या वझिरिस्तानमध्ये तालिबानचा नेता नेक मोहम्मद वझीरला ठार केलं. 2005–2007 दरम्यान अल-कायदा, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या अनेक ठिकाणांवर स्ट्राईक केले. 2005 मध्ये अल-कायदाचा दहशतवादी अबू हमझा राबियावर एअरस्ट्राईक करत ठार केलं. 2008 ते 2014 या ओबामांच्या काळात पाकिस्तानवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली. 2008 मध्ये लिबियन दहशतवादी अबू लेथ अल लिबी, 2009 मध्ये टीटीपीचा प्रमुख बैतुल्लाह मेहसूद, 2013 मध्ये टीटीपीचा प्रमुख हकीमुल्लाह मेहसूद, 2016 मध्ये अफगाण तालिबानचा प्रमुख अख्तर मन्सूर याला ठार केलं. सर्वात महत्वाचं म्हणजे 2011 साली पाकिस्तानच्याच अबोटाबादमध्ये 9/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनची हत्या केली.
दहशतवादाविरोधातील लढाईत अमेरिकेच्या निशाण्यावर सोमालिया, येमेन, लिबिया, सिरीया...
सोमालिया, येमेन, लिबिया, सिरीया सर्व देशांमध्ये अल-कायदा, इसिस आणि त्यांच्या संबंधित दहशतवादी गट आश्रय घेत होते. सुरक्षित आश्रय, प्रशिक्षण केंद्रे आणि जागतिक स्तरावर अमेरिकेवर किंवा तिच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले करण्याची क्षमता असलेले नेटवर्क सक्रिय होते. सोमालियामध्ये अल-शबाब आणि इसिस सोमालिया हा दहशतवादी गट सक्रीय होता. अल-शबाब हा दहशतवादी गट अल-कायदाचाच अफिक्रन गट आहे. सोमालियातील अल-शबाब या दहशतवादी संघटनेचा अमेरिकेसह पाश्चात्य देशांना धोका होता. अल-शबाबच्या प्रमुख तळांवर सलग हल्ले केले. 2025 मध्ये केलेल्या हल्ल्यात इसिस सोमालियाचा प्रमुख अहमद मालेनिनिनेला ठार केलं. सोमालियातली अमेरिकेची कारवाई ही 2007, 2008 करण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा 2011 पासून ते आतापर्यंत ही कारवाई सुरूच आहे.
येमेन आणि अमेरिका यांच्यातील वाद काय आहे?
येमेननंतर अमेरिकेच्या टार्गेटवर आला लिबिया. लिबियातील इसिस लिबिया या दहशतवादी संघटनेनं युनायटेड किंग्डममधील मँचेस्टरमध्ये हल्ला केला होता. यानंतरच लिबिया देखील अमेरिकेच्या टार्गेटवर आला. 2011 मध्ये गद्दाफीच्या पतनानंतर लिबिया पूर्णपणे अराजकतेत गेली. राजकीय अस्थिरतेचा फायदा घेत इसिसने लिबियामध्ये मोठ्या प्रमाणात तळ निर्माण केले. युरोप आणि उत्तर आफ्रिकेत हल्ल्यांचं नियोजन आणि भरती प्रक्रिया सुरू केली.
लिबिया हे भौगोलिकदृष्ट्या युरोपजवळ असल्याने अमेरिकेसह पाश्चात्य देशांसाठी धोका होता. 2015 ते 2019 दरम्यान प्रमुख हवाई हल्ले आणि ड्रोन हल्ले केले. पहिल्याच मोठ्या हल्ल्यात इसिसचा टॉप कमांडर अबू नबील अल-अंबारी ठार झाला.
अमेरिकेने लिबियात केलेल्या कारवाया किती महत्वाच्या होत्या?
लिबियाप्रमाणेच सीरियात देखील असाच दहशतवाद पसरला होता. इसिसचं मुख्य केंद्र हे इराक आणि सीरियामध्ये पसरत होतं. 2014 ते आतापर्यंत अमेरिकेने सीरियात लष्करी कारवाई केली. 2014मध्ये अमेरिकेने इसिस आणि अल-नुसरा फ्रंटवर पहिला हवाई हल्ला केला. 7 एप्रिल 2017 ला अमेरिकेने शायरात एअरबेसवर क्रूझ मिसाईलने हल्ला केला. हे अमेरिकेचे असद सरकारवरचे पहिले थेट लष्करी आक्रमण होते. एप्रिल 2018 मध्ये Douma रासायनिक हल्ल्याच्या प्रत्युत्तरात अमेरिका-युके-फ्रान्सने हल्ला केला. 2017 पर्यंत ISIS ने सीरियातील बहुतेक भूभाग गमावला. 2018 ला अमेरिका ISIS वर “military victory” जाहीर केली.
अमेरिकेचं दुसरं टार्गेट ड्रग्ज नष्ट करणं..नायजेरीया आणि व्हेनेझुएला....
अमेरिकेचं दुसरं महत्वाचं टार्गेट होतं ड्रग्ज नष्ट करणं आणि यात अमेरिकेच्या निशाण्यावर होते 2 महत्वाचे देश. नायजेरीया आणि व्हेनेझुएला. नायजेरीयात दहशतवाद आणि ड्रग्ज माफिया हे मोठ्या प्रमाणात होतं. ड्रग्जच्या माध्यमातून पैसा मिळवायचा आणि त्यातून दहशतवाद पसरवायचा हे गणित होतं. बोको हराम, इसिस साहेल आणि स्थानिक लकुअरवा या दोन दहशतवादी संघटनेवर 2025 पासून हल्ले करायला सुरूवात केली. इसिसने फ्रान्स, ब्लेजियममध्ये हल्ले केले होते. युरोपमध्ये या दहशतवादी संघटनांमुळे अमेरिकेच्या मित्रपक्षांना धोका निर्माण होत होता. आणि म्हणूनच या तीनही दहशतवादी संघटनेवर टॉमहॉक मिसाईल डागल्या. अमेरिकेच्या या कारवाईने इसिसचे अनेक महत्वाचे दहशतवादी ठार झाले. यानंतर नायजेरियाला लष्करी, तांत्रिक आणि गुप्तचर संस्थांचं पाठबळ दिलं.
या वर्षाच्या सुरूवातीलाचा अमेरिकेने जगाला सरप्राईज करणारी अॅक्शन केली आणि थेट व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्याच देशात घुसून अटक केली आणि अमेरिकेत आणलं. ऑपरेशन ॲब्सोल्युट रिझोल्व्ह अंतर्गत ही कारवाई केली. अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना राजधानी कॅराकस येथून ताब्यात घेतले आणि त्यांना न्यूयॉर्कला नेले.
मादुरो यांच्यावर कोकेनची तस्करी आणि शस्त्रास्त्रांशी संबंधित गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमेरिकेने सुमारे १५० विमानांच्या मदतीने हवाई हल्ले केले. या कारवाईत व्हेनेझुएलाचे काही सुरक्षा रक्षक मारल्याची माहिती आहे. या 9 देशांप्रमाणेच सध्या अमेरिकेची इराणमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्करी कारवाई सुरू आहे. आणि यातही इराणचा सुप्रीम लीडर अयातुल्लाह खामेनी यांना ठार मारलं. 2001 पासून अमेरिकेने केलेल्या युद्धात आतापर्यंत 9 लाख 40 हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले.
10 युद्धात किती लोक मारले गेले...
2001 ते 21 दरम्यान अफगाणिस्तानमध्ये 2 लाख 43 हजार लोक मारले गेले
2003 ते 21 दरम्यान इराकमध्ये 3 लाख 15 हजार लोक मारले गेले
2014 ते 21 दरम्यान सिरीयामध्ये 2 लाख 69 हजार लोक मारले
2002 ते 21 दरम्यान येमेनमध्ये 1 लाख 12 हजार लोक मारले गेले
… की जग आणखी अस्थिर बनलं…?
अमेरिकेच्या या war on terror मोहिमेत लाखो लोक नाहक देखील मारले गेले. तर शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात अमेरिकेला यश आलं. पण फक्त रक्तच नाही… अमेरिकेने पैसाही प्रचंड खर्च गेला. 2001पासून अमेरिकेने 5.8 ट्रिलियन डॉलर खर्च केला. तर माजी सैनिकांवर पुढील 30 वर्षात 2.2 ट्रिलियन डॉलर खर्च करणार आहे. म्हणजेच तब्बल 8 ट्रिलियन डॉलर खर्च अमेरिकेने खर्च केला. अमेरिकेने गेल्या 20 वर्षात 5.8 ट्रिलियन डॉलर खर्च केला. अमेरिकेची ‘War on Terror' मोहीम जगातील इतिहासातील सर्वात लांबणारी, सर्वात खर्चिक आणि लाखो जीवांचे भविष्य बदलणारी मोहीम ठरतेय. पण एक प्रश्न अजूनही उरतो… या युद्धांनी दहशतवाद कमी केला… की जग आणखी अस्थिर बनलं…?