Meta AI Smart Glasses: तुमचा वैयक्तिक डेटा आणि प्रायव्हसी खरोखर सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित करणारी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुम्ही चश्मा घातला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की कोणीही तुम्हाला बघत नाहीये, तर तुम्ही चुकीचे ठरू शकता.
मेटा कंपनीच्या एआय स्मार्ट चश्म्यातून रेकॉर्ड होणारे तुमचे अत्यंत खाजगी क्षण चक्क त्रयस्थ व्यक्तींकडून पाहिले जात असल्याचा खळबळजनक दावा एका आंतरराष्ट्रीय अहवालात करण्यात आला आहे. यामध्ये लोकांचे वैयक्तिक आयुष्य, बेडरूममधील क्षण आणि अगदी टॉयलेटमधील दृश्येही इतरांच्या स्क्रीनवर दिसत असल्याचे समोर आले आहे.
तुमच्या खासगी आयुष्यात META AI चा शिरकाव?
मेटा कंपनीने रे-बॅनसोबत मिळून तयार केलेले एआय स्मार्ट ग्लासेस सध्या जगभरात चर्चेत आहेत. दिसायला स्टायलिश असलेल्या या चश्म्यांमध्ये कॅमेरा आणि मायक्रोफोन बसवण्यात आले आहेत. युझर्स फक्त हे मेटा असे बोलून फोटो काढू शकतात किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात.
मात्र, ही सुविधा जितकी सोयीस्कर वाटते, तितकीच ती भयानक असल्याचे आता उघड झाले आहे. स्वीडिश वृत्तपत्र गोटेबोर्ग्स-पोस्टन आणि स्वेन्स्का डॅगब्लाडेट यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, या चश्म्यातून रेकॉर्ड झालेले व्हिडिओ हजारो किलोमीटर दूर केन्याची राजधानी नैरोबीमध्ये बसलेले डेटा वर्कर्स पाहत आहेत. हे कर्मचारी एआय मॉडेलला अधिक अचूक बनवण्यासाठी या व्हिडिओंचे विश्लेषण करतात आणि त्यांना लेबल लावण्याचे काम करतात.
( नक्की वाचा : India Pakistan War: रेशन भरून ठेवा, कारण आता पाकिस्तानची बारी'; महिला ज्योतिष्याने सांगितली युद्धाची तारीख! )
कर्मचाऱ्यांचे धक्कादायक खुलासे
या प्रक्रियेत काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी अत्यंत विचलित करणारे दावे केले आहेत. समा नावाच्या टेक कंपनीसाठी काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या मते, त्यांना दररोज लोकांच्या अतिशय खासगी आयुष्यातील क्लिप्स पाहाव्या लागतात. यामध्ये लोक कपडे बदलताना, टॉयलेटचा वापर करताना आणि शरीरसंबंध ठेवतानाचे व्हिडिओ देखील समाविष्ट असतात.
एका कर्मचाऱ्याने सांगितले की, आम्ही लोकांच्या लिव्हिंग रूमपासून त्यांच्या नग्न शरीरापर्यंत सर्व काही पाहतो. अनेकदा चश्मा वापरणाऱ्या व्यक्तीला हे माहितच नसते की त्यांचे रेकॉर्डिंग सुरू आहे आणि ते जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात कोणाकडून तरी पाहिले जात आहे.
( नक्की वाचा : Iran War : अमेरिकन फायटर जेट्स भारत कधीही खरेदी का करत नाही? वाचा अमेरिकेच्या 'डबल गेम'ची ती जुनी गोष्ट! )
आर्थिक फसवणुकीचा आणि स्कॅमचा धोका
केवळ खाजगी क्षणच नाही, तर लोकांची आर्थिक माहितीही या चश्म्यामुळे धोक्यात आली आहे. अहवालानुसार, अनेक व्हिडिओमध्ये युझर्सचे बँक कार्ड, पिन नंबर आणि इतर संवेदनशील कागदपत्रे स्पष्टपणे दिसतात. जर या क्लिप्स लीक झाल्या, तर मोठ्या प्रमाणावर सायबर घोटाळे किंवा ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडू शकतात, अशी भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अनेक वर्कर्सनी सांगितले की, हे सर्व पाहणे त्यांना आवडत नाही, परंतु नोकरी जाण्याच्या भीतीने त्यांना या क्लिप्सचे वारंवार निरीक्षण करावे लागते.
मेटा कंपनीची अधिकृत भूमिका काय?
या संपूर्ण प्रकरणावर मेटा कंपनीने आपली बाजू मांडताना सांगितले आहे की, त्यांचे स्मार्ट ग्लासेस प्रायव्हसी लक्षात घेऊनच तयार करण्यात आले आहेत. युझर्सचा त्यांच्या डेटावर पूर्ण ताबा असतो, असा दावा कंपनीने केला आहे. मात्र, कंपनीच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, एआयसोबत होणारे संवाद किंवा काही व्हिडिओ क्लिप्स ऑटोमेटेड किंवा मॅन्युअल पद्धतीने तपासाव्या लागतात. याचा अर्थ असा की, एआयला प्रशिक्षित करण्यासाठी माणसे हे व्हिडिओ पाहू शकतात. कंपनीने युझर्सना एआयसोबत कोणतीही संवेदनशील माहिती शेअर न करण्याचा सल्ला दिला आहे.
स्मार्ट चश्म्यांची वाढती बाजारपेठ आणि धोके
एआय चश्म्यांची क्रेड सध्या वेगाने वाढत आहे. आकडेवारीनुसार, 2023-2024 मध्ये सुमारे 20 लाख स्मार्ट चश्म्यांची विक्री झाली होती. 2025 मध्ये हा आकडा तब्बल 70 लाख युनिट्सपर्यंत पोहोचला आहे. तंत्रज्ञानाचा वापर जसा वाढतोय, तशीच लोकांच्या खाजगी आयुष्याची सुरक्षा धोक्यात येत आहे. हे स्मार्ट गॅजेट्स आपल्या सोयीसाठी आहेत की आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी, असा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
( स्पष्टीकरण : ही बातमी सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार केलेली आहे.NDTV नेटवर्क यामधील कंटेटच्या प्रमाणीकरणाची पृष्टी करत नाही.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world