ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये शनिवारी एका शॉपिंग सेंटरमध्ये (Sydney Mall Stabbings) 5 जणांची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोराची गोळी मारुन हत्या केली. सिडनीमधील वेस्टफिल्ड बॉन्डी जंक्शन मॉल परिसरात ही घटना घडल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
शनिवारी दुपारी ही घटना घडली तेव्हा मॉलमध्ये मोठी गर्दी होती. या घटनेनंतर मॉल बंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचबरोबर नागरिकांनी या जागेपासून दूर राहण्याचं आवाहन त्यांनी केलंय. या हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यापूर्वी या हल्लेखोरांनं 5 जणांची हत्या केली होती.
ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांकडून शोक
ऑस्ट्रेलियन मीडियामधील एका वृत्तानुसार प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, 'एक व्यक्ती लोकांचा पाठलाग करत होता आणि त्यांना चाकूनं मारत होता. त्यानंतर हा वेस्टफिल्ड बॉन्डी जंक्शन मॉल रिकामा करण्यात आला. 'द सिडनी मॉर्निंग हेरॉल्डमधील रिपोर्टनुसार कॅनबेरामधील पोलिसांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांना या प्रकरणाची माहिती दिली. 'या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. पोलिसांनी दाखवलेल्या धैर्याला आम्ही सलाम करतो,' असं ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. या प्रकरणाचं दहशतवादी हल्ल्याशी काही कनेक्शन आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत.
अंधश्रद्धेचा कळस : महिलेनं नवऱ्याला भोसकलं, मुलांना धावत्या कारमधून फेकून दिलं, आणि अखेर...
चाकू हल्ल्यानंतर गोंधळ
या घटनेला जबाबदार असलेल्या हल्लेखोराचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. चाकू हल्ल्यानंतर मॉलमध्ये गोंधळाचं वातावरण होतं, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनं दिली. मॉलमधील व्यक्ती सुरक्षित जागी आसरा घेण्यासाठी पळत होते. नंतर पोलीस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. काही जण येथील सुपर मार्केटमध्ये एक तास लपून बसले होते. पोलिसांचे सायरन आणि हेलिकॉप्टरच्या आवाजानं हा परिसर दणाणून गेला होता.