तृप्ती पालकर, प्रतिनिधी
बांगलादेशची परिस्थितीती सुधारण्याऐवजी पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे. शेख हसीना (Sheikh Hasina) सत्तेतून दूर झाल्यानंतर अंतरिम सरकारची धुरा आपल्या हाती घेणारे मोहम्मद युनूस Muhammad Yunus) राजीनामा देण्याची चर्चा आता सुरु झाली आहे. त्यांनी दिलेलं एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे एकीकडे तिथले पक्ष आणि दुसरीकडे लष्करही त्यांच्याकडून सत्ता हिसकावण्याची तयारी करत आहेत. खरंतर चीनच्या साथीने मोहम्मद युनूस भारतासोबत पंगा घेण्याच्या विचारात होते. पण, त्यांना त्यांच्याच जनतेने धक्का दिलाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बांगलादेशमध्ये शेख हसीना सरकार पायउतार होऊन आता 10 महिने उलटले आहेत. त्यानंतरही शेजारच्या देशामधील राजकीय अस्थिरता संपलेली नाही. बांगलादेशात पुन्हा एकदा अंतरिम सरकारच्या विरोधात असंतोषाची लाट पसली आहे. त्यामुळे मोहम्मद युनूस यांचं सरकार धोक्यात आहे. महत्वाचं म्हणजे अंतरिम सरकार आणि सैन्याचे लष्करप्रमुख यांच्यात सुप्त संघर्ष पेटल्याची चर्चा आहे. वाढता हिंसाचार आणि राजकीय अस्थिरतेमुळे मोहम्मद युनूस राजीनामा देण्याच्या विचारात आहेत.
युनूस सरकार अपयशी
शेख हसीना पदच्युत झाल्यानंतर,देशात सुधारणार आणि स्थिरता आणार, असं आश्वासन देणारे नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांना त्यांच्या कामाची छाप पाडता आली नाही. उलट, त्यांच्या राजवटीत अल्पसंख्याक, विशेषतः हिंदूंवरील अत्याचार कमी होण्याऐवजी वाढले आहेत.
( नक्की वाचा : Pakistan News : तुकडे-तुकडे पाकिस्तान! स्वतंत्र बलुचिस्ताननंतर आता सिंधुदेशाची मागणीही तीव्र, वाचा सविस्तर )
भारताच्या पुढाकारातूनच बांग्लादेशचं निर्माण झाला. पण, आता भारताला डिवचंण्याचं काम त्यांनी सुरु केलं होतं. त्यासाठी मोहम्मद युनूस यांनी चीनसाठी बांगलादेशाचे दरवाजे खुले केले आहेत.चीनने समुद्रमार्गे बांगलादेशात व्यापार विस्तार करावा...असं खुलं आमंत्रण युनूस यांनी दिलं. तर, बांगलादेश हाच 'गार्डियन ऑफ दी सी' असल्याचा दावाही केला आहे. युनूस यांचं आंतरराष्ट्रीय धोरण आणि त्यांनी शांततेचं दिलेलं आश्वासन यांना दोन्ही फोल ठरल्याने स्थानिक नेतेमंडळीच आता विरोध करत आहेत. हा असंतोष पाहता युनूस खरंच राजीनामा देणार की, की ही केवळ धमकी आहे असाही प्रश्न निर्माण होत आहे.
युनूस यांना आश्वासनाचा विसर
बांगलादेशमध्ये 5 ऑगस्टला शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर युनूस यांनी अंतरिम सरकार स्थापन केले. त्यावेळी काही महिन्यांमध्येच निवडणुका घेण्याच्या आश्वासनाचा युनूस यांना विसर पडला आहे. त्यामुळे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) आणि लष्करप्रमुख आक्रमक झाले आहेत
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने मोहम्मद युनूस यांच्या विरोधात आघाडी उघडत युनूस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. म्यानमार सीमेवरील राखीन जिल्ह्यात मानवतावादी कॉरिडॉर बांधण्याला लष्काराचा विरोध आहे. लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमा यांनी रक्तरंजित कॉरिडॉर असा उल्लेख करत.अंतरिम सरकारला अल्टीमेटम दिलाय.त्यामुळेच युनूस यांच्या राजीनाम्याच्या चर्चेकडे लष्करप्रमुखांविरुद्ध आंदोलन सुरू करण्याचा डाव म्हणून पाहिली जातंय.
भारताची भूमिका काय?
बांगलादेश आपला शेजारी देश आहे, शेख हसीना यांनी सत्ता सोडल्यानंतर भारतामध्ये आश्रय घेतला. त्याचबरोबर चीनच्या साम्राज्यवादाचा धोकाही आपल्याला आहे. त्यामुळे बांगलादेशात अस्थिरता निर्माण झाली तर भारताला अनेक कांगोऱ्याचा विचार करुनच भूमिका निश्चित करावी लागेल.
बांगलादेशात निवडणुका होऊन एक स्थिर सरकार येणं हे भारतासाठीही महत्वाचं आहे. मात्र, एकदा सत्ता मिळवल्यावर बांग्लादेशमधील नेत्यांना तिचा मोह आवरत नाही हे इतिहास सांगतो. 1991 पर्यंत, बांगलादेशात राष्ट्रपतींची निवड जनतेतून मतदानाने होत असे. त्यानंतर घटनात्मक बदलांनी राष्ट्रपतीची निवड संसदेद्वारे होऊ लागली.
पुढे शेख हसीनांनी 20 वर्षे बांगलादेशची सुत्रं हातात ठेवली. त्यामुळे जरी युनूस यांच्या राजीनाम्याच्या बातमीवर किती विश्वास ठेवायचा ते खरंच राजीनामा देऊन निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा करणार हा खरा प्रश्न आहे.