'ती' कोण होती? महिलेसोबत फ्लॅटमध्ये जाताच फसले बांगलादेशचे खासदार, मृतदेहच बाहेर आला

Anwarul Azim Anar Murder कोलकाता पोलीस सध्या विद्या बालनच्या 'कहानी' चित्रपटासारखा गुंता सोडवत आहेत.

Advertisement
Read Time: 4 mins
बांगलादेशच्या खासदाराची फ्लॅटमध्ये हत्या झाली.
मुंबई:

कोलकाता पोलीस सध्या विद्या बालनच्या 'कहानी' चित्रपटासारखा गुंता सोडवत आहेत. हे हायप्रोफाईल प्रकरण आहे. बांगलादेशमधून कोलकातामध्ये आलेल्या खासदाराचा मृतदेह एका हॉटेलच्या रुममध्ये सापडला. या रुममध्ये काही पुरावे आहेत.. जे मारेकऱ्यानं सोडलेत. पण, मारेकरी आणि हत्येचं कारण हे मोठं कोडं आहे. कोलकाता पोलीस ते सोडवण्याचा प्रयत्न सध्या करतायत. बांगलादेश कोलकाता आणि थेट अमेरिकेपर्यंत या मर्डर मिस्ट्रीचे कनेक्शन आहे. पाहूया या मर्डर मिस्ट्रीची संपूर्ण 'कहानी'

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

8 दिवस बेपत्ता आणि...

बांगलादेशच्या संसदेत तीन वेळा निवडून आलेले खासदार  अनावरुल अजीम अनार (Anwarul Azim Anar) 12 मे रोजी उपचारासाठी कोलकातामध्ये आले होते. ते बारानगरमध्ये त्यांचे मित्र गोपाल बिस्वास यांच्या घरी उतरले होते.

अनार 14 मे रोजी डॉक्टरकडं उपाचारासाठी जातो आणि संध्याकाळी घरी परततो, असं सांगून बिस्वास यांच्या घरातून बाहेर पडले. त्यांनी त्यानंतर टॅक्सी केली. 'मी दिल्लीला जात आहे,' असा मित्राला व्हॉट्सअपवर मेसेज केला. त्यानंतर ते बेपत्ता झाले. सर्वत्र शोधाशोध करुनही अनार यांचा ठावठिकाणा समजत नव्हता. त्यानंतर बिस्वास यांनी 18 मे रोजी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.

बिस्वास यांनी तक्रार दाखल करताच पोलिसांनी तपास सुरु केला. त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. अनार यांचा मोबाईल नंबर बंद होता. अखेर 22 मे रोजी कोलकातामधील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. भारत आणि बांगलादेशच्या तपास एजन्सी या प्रकरणाचा संयुक्त तपास करत आहेत. हत्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 मे रोजी या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली. न्यू टाऊनमधील ज्या फ्लॅटमध्ये बांगलादेशी खासदारांना जाताना शेवटचं पाहिलं होतं त्या फ्लॅटचा मालक उत्पादन शुल्क अधिकारी आहे. त्यानं त्याच्या मित्राला हा फ्लॅट भाड्यानं दिला होता, असं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालंय. 

( नक्की वाचा : भारतामध्ये उपचारासाठी आलेल्या बांगलादेशच्या खासदाराची हत्या )

हनी ट्रॅपचे शिकार?

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, 'बांगलादेशचे खासदार एका महिलेच्या 'हनी ट्रॅप' च्या जाळ्यात फसले. ही महिला खासदारांच्या मित्राची निकटवर्तीय होती. त्या महिलेनंच अनार यांना न्यू टाऊनमधील फ्लॅटमध्ये येण्याचं प्रलोभन दिलं अशी शक्यता आहे. अनार फ्लॅटमध्ये जाताच त्यांची हत्या करण्यात आली,' अशी शक्यता या अधिकाऱ्यानं व्यक्त केली. भाडोत्री मारेकऱ्यांकडून अनार यांची हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

Advertisement

या प्रकरणात अटक झालेला व्यक्ती हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एकाला भेटला होता.  ती व्यक्ती बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय बॉर्डरवरच्या जवळ असलेल्या पश्चिम बंगालमधील भागातील रहिवासी आहे, असं पोलिसांनी सांगितलं. 

( नक्की वाचा : Explainer : इराणच्या अध्यक्षांचा अपघाती मृत्यू भारतासाठी किती मोठा धक्का आहे? )

मित्रानंच दिली 5 कोटींची सुपारी ?

बांगलादेशी खासदाराच्या मित्रानंच त्यांच्या हत्येसाठी 5 कोटींची सुपारी दिली, अशी माहिती सुरुवातीच्या तपासातून समोर आलीय. पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार त्या खासदारांचा मित्र सध्या अमेरिकेत आहे. त्याचा कोलकातामध्ये फ्लॅट आहे. 

Advertisement

100 कोटींचं सोनं हत्येचं कारण?

'टाईम्स ऑफ इंडिया' च्या वृत्तानुसार अनावरुल अजीम अनार यांच्या हत्येची सुपारी त्यांच्याच जवळच्या खासदारानं दिली आहे. सोनं तस्करीचा वाद हे या सुपारीचं कारण समजलं जातंय. बांगलादेशी गुप्तचर यंत्रणेनुसार अख्तरुज्जमां शाहीन हा या हत्येचा मास्टरमाईंड आहे. शाहीन बांगलादेशी वंशाचा अमेरिकन नागरिक आहे. तो सोन्याच्या तस्करीचं काम करतो. तो सध्या अमेरिकेत असला तरी भारत आणि बांगलादेशमध्ये त्याचं येणं-जाणं आहे. अनेक बेकायदेशीर धंद्यांमध्ये तो सहभागी आहे. 

'द डेली स्टार'च्या वृत्तानुसार अख्तरुज्जमां आणि अजीम हे लहानपणापासून मित्र आहेत. हे दोघंही भारतामध्ये सोनं तस्करी आणि अन्य प्रकरणात सहभागी होते, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. सोन्याच्या तस्करीतील पैशांवरुनच अजीम आणि शाहीन यांच्यात भांडण झालं. त्यानंतर शाहीन यांनी आजीम यांच्या हत्येचं प्लॅनिंग केलं आणि त्यासाठी पाच कोटींची सुपारी दिली. 

अनेक ठिकाणी फेकले मृतदेहाचे तुकडे...

बांगलादेशी खासदाराच्या हत्येचा तपास करणाऱ्या पश्चिम बंगाल पोलिसांच्या गुन्हे शाखेला गुरुवारी काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. या तपासात मिळालेल्या माहितीनुसार या खासदारांची कोलकातामध्ये हत्या झाल्यानंतर त्यांचं कातडं काढलं गेलं. मृतदेहाचे तुकडे केले ते प्लॅस्टिक भागमध्ये भरुन शहरभर फेकण्यात आले. या प्रकरणात मुंबईमध्ये राहणारा अवैध बांगलादेशी जिहाद हवालदारलाही अटक करण्यात तपास यंत्रणांना यश आलंय. 

( नक्की वाचा : 25 दिवस शिल्लक? भारतीय ज्योतिषाने केली तिसऱ्या विश्वयुद्धाची भविष्यवाणी )

कोण आहे मास्टरमाईंड?

सीआयडी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिहाद हवालदारनं कोलकातामधील न्यूटाऊनमधील प्लॅटमध्ये बांगलादेशी खासदाराची हत्या तसंच मृतदेहाचे तुकडे केल्याचं मान्य केलंय. हवालदारच्या कथित खुलाश्यानुसार या हत्येचा मास्टरमाईंड बांगलादेशी वंशाचा अमेरिकी नागरिक अख्तरुज्जमां आहे. त्याच्या सांगण्यानुसार हवालदारनं त्याच्या 4 साथीदारांसह अनार यांची गळा दाबून हत्या केली. 
 

Advertisement