इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी (Ebrahim Raisi) यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झालाय. या अपघातामध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन आमीर अब्दुल्लाहियन (Hossein Amir Abdollahian) यांचाही मृत्यू झालाय. रईसी यांचा मृत्यू पश्चिम आशियातील राजकारणासाठी मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. भारत-इराण संबंध भक्कम करण्यासाठी रईसी यांचं नेहमी स्मरण केलं जाईल, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
Deeply saddened and shocked by the tragic demise of Dr. Seyed Ebrahim Raisi, President of the Islamic Republic of Iran. His contribution to strengthening India-Iran bilateral relationship will always be remembered. My heartfelt condolences to his family and the people of Iran.…
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2024
भारत आणि इराण यांनी 13 मे रोजी चाबहार बंदराच्या व्यवस्थापनाबाबत एक सामंजस्य करार केला होता. अमेरिकेनं आक्षेप घेतल्यानंतरही भारतानं हा करार करण्याचं ठरवलं. त्यावरुन या कराराचं महत्त्व लक्षात येईल. रईसी यांच्या कार्यकाळातच चाबहार करार होऊ शकला. इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतामधील खोल पाण्यात असलेल्या चाबहार बंदरात मोठे मालवाहू जहाज सहजपणे ये-जा करु शकतात. त्यामुळे भारत, इराण, अफगाणिस्तान आणि युरेशिया एकमेकांशी जोडले जातील. चीनच्या महत्त्वकांक्षी बोल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला (बीआरटीआय) चाबहार करार हे भारताचं उत्तर मानलं जातं.
( नक्की वाचा : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचं निधन, हेलिकॉप्टरमधील नऊ जणं दगावल्याची भीती )
अमेरिकेनं अण्विक कार्यक्रम, मानवाधिकाराची पायपमल्ली आणि दुसऱ्या देशांना छुपी मदत केल्याच्या आरोपाखाली इराणवर कठोर निर्बंध लादले आहेत. इराणबरोबर एकत्र काम करणारे देशही या बंदीच्या प्रभावक्षेत्रात येतात. याच कारणांमुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपनींनी इराणबरोबर व्यापारी करार तोडले आहेत.
( नक्की वाचा : किर्गिस्तानमध्ये काय घडलं? ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानचं टेन्शन वाढलं? )
चाबहार बंदराबाबतच्या सहकार्य करारासाठी भारत 2003 पासून प्रयत्नशील होता. त्यानंतर अखेर 2016 साली याबाबत करार झाला. नवा करार याच जुन्या कराराचा विस्तार आहे. रईसी यांच्या कार्यकाळातच हा विषय पुढं सरकला. ब्रिक्स परिषदेच्या दरम्यान 2023 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इब्राहिम रईसी यांची भेट झाली होती. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जानेवारी महिन्यात इराणचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी रईसी यांची भेट घेतली होती. भारत-इराण संबंधांना आणखी बळकटी देण्यासाई रईसी पुढच्या महिन्यात भारतामध्ये येणार होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे भारतानं आपला एक मित्र गमावला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world