दक्षिण चीन समुद्रात निसर्गाचा एक अत्यंत विस्मयकारक आणि अद्भूत चमत्कार शास्त्रज्ञांच्या हाती लागला आहे. समुद्रामध्ये एक असा महाकाय 'ब्लू होल' सापडला आहे, ज्याच्या आकारात 4 बास्केटबॉल कोर्ट सहज सामावू शकतात. जेव्हा शास्त्रज्ञांनी या होलच्या पाण्याची आणि मातीची प्रयोगशाळेत वैज्ञानिक तपासणी केली, तेव्हा तिथे 2700 हून अधिक नवीन आणि दुर्मिळ सागरी जीवांची एक संपूर्ण वेगळीच दुनिया नांदत असल्याचे उघड झाले.
प्रवाळांच्या खडकांपासून बनलेला 3200 वर्षे जुना 'टाइम कॅप्सूल'
चीनच्या पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लू होल सुमारे 3200 वर्षे जुना आहे. जगातील बहुतांश ब्लू होल हे हिमयुगात तयार झालेल्या कोरड्या गुहा पाण्याखाली बुडाल्यामुळे बनले आहेत. मात्र, दक्षिण चीन समुद्रात सापडलेला हा खड्डा पूर्णपणे वेगळा आहे. प्रवाळांच्या खडकांची नैसर्गिक वाढ आणि ते एकावर एक जमा होत गेल्याने या वैशिष्ट्यपूर्ण विवराची निर्मिती झाली आहे.
चीनच्या शास्त्रज्ञांनी अत्याधुनिक अंडरवॉटर रोबोट्स, ड्रोन आणि गोताखोरांच्या मदतीने या जागेचे नमुने गोळा केले. लॅबमध्ये या पाण्यातील ई-डीएनए आणि मातीचे नमुने तपासले असता, एकाच ठिकाणी 2700 हून अधिक प्रजातींचे वास्तव्य आढळले. म्हणूनच शास्त्रज्ञ याला पृथ्वीच्या इतिहासाचे रहस्य उलगडणारा 'टाइम कॅप्सूल' मानत आहेत.
वादग्रस्त भागावर ताबा मिळवण्याची चीनची खेळी?
'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या अहवालानुसार, हा ब्लू होल ज्या भागात सापडला आहे, त्या 'स्कारबोरो शोल' क्षेत्रावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा वाद आहे. ही जागा फिलिपिन्सच्या किनारपट्टीपासून अवघ्या 230 किलोमीटर, तर चीनपासून 874 किलोमीटर अंतरावर आहे. चीन या भागाला आपला सांगत 'हुआंगयान द्वीप' म्हणतो, तर फिलिपिन्स यावर आपला हक्क सांगत 'पानाटाग शोल' असे नाव देतो.
साल 2012 च्या वादानंतर या भागावर चीनने प्रत्यक्ष ताबा मिळवला आहे. सप्टेंबर 2023 मध्ये चीनने या परिसराला 'नेचर रिझर्व्ह' घोषित केले होते. जाणकारांच्या मते, वैज्ञानिक संशोधनाच्या आणि सागरी सुरक्षेच्या बहाण्याने चीन या वादग्रस्त भागावर आपली पकड अधिक मजबूत करत आहे आणि फिलिपिन्सच्या मच्छिमारांना तिथे येण्यापासून रोखत आहे.