यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Cost of US-Israeli-Iran war : अमेरिका-इस्त्रायल-इराणमधील युद्धामुळे संपूर्ण जगभरात कल्लोळ पसरला आहे. या यु्द्धात इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यामुळे इराणकडूनही अमेरिका-इस्त्रायला प्रत्युत्तर दिलं जात आहे. सहा दिवसांपूर्वी या युद्धाला सुरुवात झाली असून अद्यापही या देशांमधील संघर्ष थांबत नाहीये. परिणामी जगातील अनेक देशांमध्ये विविध कारणांनी महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणविरोधातील युद्धात होणारा खर्च हा अमेरिकेसमोरील एक मोठं आव्हान आहे. जमिनीवर हल्ला केला तर हा खर्च अजून वाढेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
इतका खर्च कुठे कुठे होतो?
युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या एका 'टोमॅहॉक' क्षेपणास्त्राची किंमत सुमारे ३० कोटी रुपये आहे, तर 'पॅट्रियट' इंटरसेप्टरची किंमत ३३ कोटी रुपयांच्या घरात आहे. पहिल्या १०० तासांत अमेरिकेने २,००० हून अधिक दारूगोळा वापरला आहे. याशिवाय B-2 बॉम्बर्स चालवण्याचा खर्च तासाला ७३ लाख रुपये आहे, तर F-35 सारख्या विमानांसाठी तासाला १४ लाख रुपये खर्च येतो. दोन विमानवाहू युद्धनौका तैनात ठेवण्यासाठी दररोज सुमारे १५० कोटी रुपये खर्च होत आहेत.
अमेरिकेला हे किती दिवस परवडेल?
अमेरिकेची अर्थव्यवस्था मोठी असली तरी सध्याची परिस्थिती आव्हानात्मक आहे. अमेरिकेचे वार्षिक संरक्षण बजेट सुमारे $८५० अब्ज (71,155 कोटी) पेक्षा जास्त आहे. हा सध्याचा खर्च त्यांच्या एकूण वार्षिक बजेटच्या तुलनेत मोठा असला तरी, ते अल्पकाळासाठी (४-६ महिने) सहज सहन करू शकतात. पेंटागॉनने आधीच ५० अब्ज डॉलर्सच्या (४.१ लाख कोटी रुपये) अतिरिक्त निधीची मागणी काँग्रेसकडे करण्याची तयारी केली आहे.
मर्यादा कुठे येईल?
अमेरिकेत लवकरच निवडणुका होणार आहेत. महागाई आणि कर्जाचा डोंगर वाढत असताना सामान्य नागरिक या खर्चाचा विरोध करू शकतात. प्रश्न केवळ पैशांचा नाही, तर 'स्टॉक' संपण्याचा आहे. ज्या वेगाने क्षेपणास्त्रे वापरली जात आहेत, त्या वेगाने त्यांचे उत्पादन करणे अमेरिकेला कठीण जाऊ शकते. युद्ध लांबल्यास कच्च्या तेलाचे दर १०० डॉलरच्या पार जातील, ज्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेत महागाई वाढून मंदी येऊ शकते.
जर हे युद्ध 'एअर कॅम्पेन' मर्यादेत राहिले, तर अमेरिका हा खर्च पुढील ६ ते ९ महिने पेलू शकते. परंतु, जर जमिनीवर सैन्य उतरवण्याची वेळ आली, तर हा खर्च ५ ते १० पटीने वाढेल, जो अमेरिकेला दीर्घकाळ परवडणारा नसेल.