John F. Kennedy Assassination Mystery : अमेरिकेचे 35 वे अध्यक्ष जॉन एफ. केनडी यांची हत्या आजही मोठं रहस्य आहे. 22 नोव्हेंबर 1963 रोजी टेक्सासमधील डलासमध्ये त्यांची हत्या झाली होती. अमेरिकेच्या इतिहासातील मोठ्या राजकीय हत्येमध्ये त्याचा समावेश होतो. त्याबाबत आजही अनेक अंदाज बांधले जातात. केनडी यांच्या हत्येमागे कुणाचा हात होता? त्यांची हत्या का करण्यात आली? हे रहस्य आता उघड होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसताच काही महत्त्वाच्या आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. त्यानुसार, जॉन एफ. केनडी यांच्या हत्येसंबंधीच्या गुप्त फाईल आता सार्वजनिक होणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
60 वर्षांनंतर उघडणार रहस्य
जॉन एफ. केनडी यांच्या हत्येला आता 70 वर्ष उलटले आहेत. पण, त्यानंतरही या विषयातील फाईल सार्वजनिक करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे अमेरिकन नागरिकांनी याबाबत सातत्यानं संशय व्यक्त केला आहे. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात या फाईल्स सार्वजनिक करण्याचं आश्वासन दिलं होतं. सत्तेवर येताच त्यांनी हे आश्वासन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
कशी झाली होती हत्या?
जॉन एफ केनडी उघड्या कारमधून जात असताना त्यांची हत्या करण्यात आली होती. ली हार्वी ओसवाल्ड या आरोपीला अटक करण्यात आली होती. ओसवाल्डला या प्रकरणात दोषी ठरवण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच अटकेनंतर दोन दिवसांनी त्याची हत्या करण्यात आली. जॅक रुबीनं त्याची हत्या केली होती. या हत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. केनडी यांची हत्या फक्त ओसवाल्डनं केली नव्हती, असं मानलं जातं.
( नक्की वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांची Drill, Baby, Drill घोषणा काय आहे? त्याचा भारतावर काय परिणाम होईल? )
काही अनुत्तरीत प्रश्न
- जॉन एफ केनडी यांच्या हत्या प्रकरणातील फाईल्स अद्याप सार्वजनिक का करण्यात आल्या नाहीत?
- केनडीची हत्या ही व्यापक कटाचा भाग होती का? या हत्येमध्यो ओसवाल्ड फक्त मोहरा होता का?
- सीआयए, माफिया किंवा अन्य शक्तीशाली संघटनेनं ही हत्या घडवून आणली का?
- अमेरिका आणि क्यूबामधील संबंध त्या काळात चिघळले होते. त्या वादातून ही हत्या झाली का?
- केनडींच्या हत्येनंतर अटक करण्यात आलेला आरोपी ओसवाल्डचीही हत्या का झाली? जॅक रुबीनं ओसवाल्डला का मारलं?
- केनडी यांच्या हत्या प्रकरणातील अनेक पुरावे नष्ट करण्यात आले असे दावे केले जातात
- केनडी हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वॉरन कमिशनच्या रिपोर्टमध्ये अनेक विरोधाभास आढळले होते. त्यामुळे लोकांच्या मनातील संशय आणखी बळावला.
कोण आहे बबुश्का लेडी?
जॉन केनडी यांच्या हत्येनं संपूर्ण जगाला धक्का बसला होता. या हत्या प्रकरणातील काही रहस्य आजही कायम आहेत. या हत्येसाठी हर्वी ओसवाल्डला अधिकृत दोषी ठरवण्यात आले होते. ओसवाल्डनं सहाव्या मजल्यावरुन केनडी यांची हत्या केली असा आरोप होता. पण, त्यानंतर ओसवाल्डची हत्या का करण्यात आली हा प्रश्न कायम आहे.
ओसवाल्डची हत्या करणारा रुबी हा केनडी समर्थक होता. केनडींच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच त्यानं ही हत्या केली असा दवा केला जातो. या संपूर्ण घटनेच्या दरम्यान एक महिला कॅमेऱ्यात दिसली होतीय 'बबुश्का लेडी' या नावानं तिला ओळखलं जातं. या महिलेचाही हत्येमध्ये संबंध असू शकतो, असं काही जणांचं मत आहे.