अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांच्यात शुक्रवारी रात्री झालेल्या चर्चेत काय घडलं हे सर्व जगानं Live पाहिलं. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरु आहे. दोन्ही नेत्यांमध्ये औपचारिक पद्धतीनं चर्चेला सुरुवात झाली. पण, त्यानंतर जे घडलं त्याची कुणालाही कल्पना नव्हती.
ट्रम्प आणि झेलन्सकी यांच्यातील सरळ पद्धतीनं सुरु झालेल्या चर्चेचं पाहता-पाहता शाब्दिक वादावादीमध्ये रुपांतर झालं. दोघांमध्ये वाद वाढल्यानंतर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी झेलेन्सकी यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, झेलेन्सकी थांबण्याच्या मूडमध्ये नव्हते. व्हाईट हाऊसमध्ये नेमकं काय झालं? कोणत्या मुद्यावर दोन्ही नेते आमने-सामने आले हे समजून घ्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय घडलं?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात रशिया-युक्रेन यांच्यातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा सुरु झाली. त्यावेळी ट्रम्प यांनी त्यांना 'तुम्ही एकतर आमच्याशी करार करा किंवा आम्ही बाहेर होतो,' असं सुनावलं.
ट्रम्प झेलन्सकीला म्हणाले की, 'तुम्ही खूप अडचणीत आहात. तुम्ही युद्ध जिंकू शकणार नाही.' त्यावर झेलेन्सकी यांनी 'आम्ही आमच्या देशात आहोत. सध्या आमची स्थिती भक्कम आहे. आम्ही तुम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आभारही मानले आहेत,' असं उत्तर दिलं.
( नक्की वाचा : US Gold Card : अमेरिकन नागरिकत्वाला जगभरात सर्वाधिक महत्त्व का? डोनाल्ड ट्रम्प ते विकत का आहेत? )
युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता पुन्हा लांबणीवर पडणार असं दिसू लागताच ट्रम्प म्हणाले, 'या पद्धतीनं सर्व गोष्टी खूप अवघड होतील, अशी मला भीती आहे. तुम्ही लाखो लोकांच्या आयुष्याशी खेळत आहेत. तिसऱ्या विश्व युद्धाचा जुगार खेळत आहात. तुम्ही जे करत आहात ते युक्रेनसाठी अत्यंत अपमानजनक आहे.'
ट्रम्प आणि झेलन्सकीमध्ये सुरु असलेल्या वादात अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स देखील सहभागी झाले. त्यांनी युद्ध समाप्त होण्यासाठी कुटूनीती आवश्यक आहे. त्यावर झेलेन्सकी यांनी पलटवार करत कसली कुटनीती? असा प्रश्न विचारला. या उत्तरानं वेन्स संतापले. त्यांनी झेलेन्सकीवर तुम्ही अध्यक्षांच्या कार्यालयाचा अपमान करत असल्याचं सांगितलं.
ट्रम्प यांनंतर झेलेन्सकी यांना उद्देशून म्हणाले की, 'आम्ही तुम्हाला 350 अब्ज डॉलर, लष्करी साहित्य आणि भक्कम पाठिंबा दिला आहे. तुम्हाला आमची लष्करी मदत नसती तर युद्ध दोन आठवड्यामध्येच समाप्त झालं असतं.'
ट्रम्प यांच्या वक्तव्यावर झेलेन्सकींनी पलटवार केला. त्यांनी ट्रम्प पुतीन सारखं बोलत असल्याचा आरोप केला. 'हो-हो दोन किंवा तीन दिवसही टिकू शकलो नसतो, मी हे पुतीनकडूनही ऐकलं आहे,' असा टोमणा झेलेन्की यांनी लगावला. त्यावर 'या पद्धतीनं काम करणे खूप अवघड होणार आहे,' असं ट्रम्प यांनी उत्तर दिलं.
ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या तिखट चर्चेनंतर झेलेन्सकी व्हाईट हाऊस सोडून निघून गेले. ते तिथं आले होते त्यावेळी ट्रम्प यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. पण, जाताना ट्रम्प त्यांना सोडायला गेले नाहीत. दोन्ही देशातील या वादात जगभरातील अनेक देशांनी विशेषत: युरोपीयन देशांनी युक्रेनला पािठंबा दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या बैठकीनंतर सोसल मीडियावर झेलेन्सकींवर टीका केली. ते शांततेसाठी तयार नाहीत. त्यांनी अमेरिकेचा अपमान केला आहे, असा आरोप केला.
या बैठकीनंतर झेलेन्सकी यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना सांगितलं की, 'मी कोणतीही माफी मागणार नाही. जे काही झालं ते दोन्ही देशांसाठी चांगलं नाही.'