रशियामध्ये रविवारी पहाटे तीव्र भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7 इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंप जमिनीच्या खाली 29 किलोमीटर झाल्याची माहिती अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेने दिली आहे. त्याचा केंद्रबिंदू पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्कीच्या पूर्वेला सुमारे 102 किलोमीटर होते.
मिळालेल्य माहितीनुसार, भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कुणीही जखमी झालेले नाही. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता, मात्र नंतर तो मागे घेण्यात आला आहे. पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्की ज्वालामुखींनी वेढलेले शहर आहे. भूकंपाच्या ठिकाणाजवळील किनारपट्टी भागात समुद्राच्या पातळीत अनेक तास चढ-उतार होऊ शकतात, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
भूकंपानंतर सिवालुच ज्वालामुखीचा उद्रेक झाला. ज्वालामुखीची राख वर उडत असल्याची देखील माहिती मिळत आहे. ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर पडत आहे. सिवालुच ज्वालामुखी पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्कीपासून सुमारे 280 मैलांवर स्थित आहे. सुमारे 181,000 एवढी लोकसंख्या या भागात आहे.