Emirates EK 501 Thriller: मुंबई ते दुबई प्रवासासाठी निघालेल्या एमिरेट्सच्या विमानाच्या बाबतीत आकाशात एक अतिशय थरारक आणि दुर्मिळ घटना घडली आहे. युएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीच्या एअर डिफेन्स सिस्टमने क्षेपणास्त्र हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर, हवेत असलेल्या या विमानाला आपला मार्ग चक्क दोनदा बदलावा लागला. याला एअर ट्रॅफिकच्या भाषेत डबल रिव्हर्स असे म्हणतात. ही घटना जितकी दुर्मिळ आहे तितकीच ती प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची ठरली आहे.
नेमकं काय घडलं?
एमिरेट्सचे ईके 501 हे भव्य एअरबस ए 380 विमान मुंबईवरून दुबईसाठी झेपावले होते. विमान आपल्या निश्चित स्थळाच्या जवळ पोहोचत असतानाच अचानक युएईच्या संरक्षण मंत्रालयाकडून एक तातडीचा सुरक्षा इशारा देण्यात आला.
उत्तरेकडून येणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा धोका ओळखून देशाची संरक्षण यंत्रणा सक्रिय झाली होती. अशा वेळी विमान ज्या मार्गावरून जात होते, तो मार्ग तातडीने रिकामा करणे गरजेचे होते. ही धोक्याची सूचना मिळताच कॉकपिटमधील वैमानिकांनी क्षणाचाही विलंब न लावता विमानाची दिशा बदलण्याचा निर्णय घेतला.
( नक्की वाचा : 'ना पाणी, ना जेवण... मी मॉस्को विमानतळावर भिकाऱ्यासारखा उभा आहे!'; मुंबईकर तरुणाची मदतीसाठी आर्त हाक )
समुद्रावर विमानाने घेतलेली दुहेरी वळणे
ओमानच्या खाडीवर असताना विमानाचा मार्ग ट्रॅक करणाऱ्या यंत्रणेत एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. सुरुवातीला या विमानाने पूर्णपणे यु-टर्न घेतला आणि ते पुन्हा मुंबईच्या दिशेने वळले. संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्याच्या किंवा संरक्षणासाठी सोडल्या जाणाऱ्या रॉकेटच्या मार्गातून बाहेर पडण्यासाठी हे पहिले वळण होते.
मात्र, थोड्या वेळाने जमिनीवरील तांत्रिक परिस्थिती बदलली आणि सुरक्षेची खात्री पटताच वैमानिकाने पुन्हा एकदा विमानाचा मार्ग दुबईच्या दिशेने वळवला. अशा प्रकारे हवेत दोनदा विरुद्ध दिशांना वळण घेण्याची ही प्रक्रिया व्यावसायिक विमान वाहतुकीत अत्यंत दुर्मिळ मानली जाते.
प्रवाशांचा जीव टांगणीला
या सर्व घडामोडींदरम्यान काही काळ विमान हवेतच एका विशिष्ट कक्षेत घिरट्या घालत होते. जोपर्यंत हवाई हद्द सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती मिळत नाही, तोपर्यंत विमान उतरवणे धोक्याचे होते. अखेर सर्व तांत्रिक बाबी तपासून आणि सुरक्षा यंत्रणांशी समन्वय साधून हे विमान दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. विमानात असलेल्या प्रवाशांनी विमान सुखरूप जमिनीला लागल्यानंतर मोठा सुटकेचा निश्वास सोडला.
विमान वाहतुकीवर परिणाम
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचा मोठा फटका सध्या पश्चिम आशियातील विमान वाहतुकीला बसत आहे. गेल्या काही दिवसांत या भागात जवळपास 13000 पेक्षा जास्त फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत.
दुबई आणि अबुधाबी सारख्या महत्त्वाच्या विमानतळांच्या परिसरातही ड्रोन हल्ल्यांमुळे किंवा त्यांच्या अवशेषांमुळे किरकोळ नुकसान झाल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळेच या भागातील हवाई प्रवास सध्या प्रचंड आव्हानात्मक झाला असून वैमानिकांना अत्यंत सतर्क राहावे लागत आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एअर इंडिया आणि इंडिगो सारख्या भारतीय विमान कंपन्यांनी 5 मार्चपर्यंत या भागातील त्यांची विमान सेवा स्थगित केली आहे. अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी केवळ काही मर्यादित सुटका विमाने चालवली जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, हवेत अशा प्रकारे डबल रिव्हर्स घेणे हे वैमानिक आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्यातील उत्तम समन्वयाचे प्रतीक आहे. सध्या आखाती देशांवरील आकाश हे युद्धजन्य परिस्थितीमुळे अस्थिर असून, प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.